एका म्हैशीचा मृत्यू, एक जखमी, ३ बेपत्ता:वनविभाग म्हणते तो वाघ नव्हे बिबट्या..
कुडाळ : कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात सह्याद्री पट्यात वसलेल्या हळदीचे नेरुर गावात आत्माराम शिवराम नाईक (यतुरेकर) यांच्या पाच जनावरांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात एका म्हैशीचा वाघाने फडशा पाडला, एक जनावर जखमी झाले तर तीन जनावरे बेपत्ता झाली आहेत. ती अद्यापही घरी परतलेली नाहीत. त्या तिन्ही जनावरांचा नाईक कुटुंबीय स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेत आहेत. मृत म्हैशीचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. सोमवार दि.२१ जुलै रोजी झालेल्या या घटनेमुळे हळदीचे नेरूर भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा हल्ला वाघांनेच केला आहे, तर वनविभागाच्या मते या भागात वाघ नसल्याने हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
कुडाळ तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात आत्माराम नाईक यांचे दाट जंगलमय भागात घर आहे. पूर्वीपासून ते आपली शेती सांभाळत इतरांची गुरे राखुन आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. आता शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे गुरांची संख्या कमी झाली. त्यामुळे आत्माराम नाईक यांच्याकडे राखणीला येणारे गुरे कमी झाली. तरी पण त्यांच्याकडे असलेल्या पाच जनावरांपैकी दोन जनावरे एका शेतकऱ्याची राखणीला होती.
नेहमीप्रमाणे त्यांनी सोमवारी आपली गुरे गोठ्यातुन घराच्या बाजूलाच चरण्यासाठी सोडली होती. मात्र नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या सत्रात आपली गुरे आली नसल्यामुळे त्यांचा जीव कासावीस झाला. त्यांनी आपल्या गुरांचा शोध सुरू केला असता त्यांना आपल्या पाच गुरांपैकी एक म्हैस घरापासून काही अंतरावर मृताअवस्थेत आढळून आली. त्या म्हशीचा बहुतांश भाग वाघाने खाल्लेला दिसून आला. इतर जनावरांचा शोधाशोध घेतला असता त्या पाच पैकी एक म्हैस गंभीर जखमी अवस्थेत सायंकाळी उशिरा घरी परतली, तर तीन जनावरे बेपत्ता झाली. या जनावरांचा नाईक कुटुंबीय स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या भागातील जंगलमय परिसरात शोध घेत आहेत. मात्र दोन दिवस उलटले तरी गुरे दृष्टीस पडत नसल्यामुळे त्या गुरांचा सुद्धा वाघाने फडशा पाडला असल्याची भीती नाईक कुटुंबियांमधून व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच कुडाळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यानी घटनास्थळी भेट देऊन मृत व गंभीर जखमी गुरांचा पंचनामा केल्याचे सांगण्यात आले. वाघाच्या या हल्ल्यामुळे या भागातील शेतकरी भितीच्या छायेत वावरत आहेत. या हल्ल्यानंतर वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील शेतकरीवर्गातून केली जात आहे.
तो हल्ला वाघाचा नव्हे तर बिबट्याचा – वनविभाग
हळदीचे नेरूर येथील आत्माराम नाईक यांच्या गुरांवर जंगलात वाघाने हल्ला केला नसून तो हल्ला बिबट्याने केला आहे. या भागात वाघ नसून बिबटे आहेत. या बिबट्याच्या हल्ल्यात एक म्हैस मृत पावली आहे तर एक म्हैस जखमी झाली आहे. त्याचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत पंचनामा केला. या हल्ल्यादरम्यान अन्य दोन-तीन जनावरे बेपत्ता झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. मृत पावलेल्या गुराची नुकसान भरपाई वैद्यकीय अधिकाऱ्याच्या रिपोर्टनुसार दिली जाईल असे कुडाळ वनक्षेत्रपाल संदिप कुभार यांनी सांगितले.