आम. निलेश राणे:मच्छिमारांनी घेतली आम. राणे यांची भेट..
⚡मालवण ता.२३-:
मालवण समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांनी मासेमारीच्या कामांसाठी उभारलेल्या झोपड्या व तात्पुरती बांधकामे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हटविण्याच्या नोटीसा प्रशासनाने दिल्याने चिंताग्रस्त बनलेल्या मच्छिमारांनी आज कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची मालवण येथील निलरत्न निवासस्थानी भेट घेऊन आपला व्यवसाय वाचवण्यासाठी निवेदन दिले. याप्रसंगी प्रांताधिकाऱ्यांशी दोन दिवसात चर्चा करून या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही आम. निलेश राणे यांनी दिली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, संजय पडते, दादा साईल, राजा गावडे, दीपक पाटकर यांच्यासह विली फर्नांडिस, बाबला पिंटो, गोपीनाथ तांडेल, विकी चोपडेकर, ऑल्वीन फर्नांडिस, रॉकी डिसोजा, महेश दुदम, सिमसन फर्नांडिस, लिनेश तांडेल तसेच अनेक स्थानिक मच्छीमार आणि व्यावसायिक उपस्थित होते.
मालवण बंदर समुद्र किनारी मच्छिमारांनी व्यवसायासाठी यापूर्वी झावळाच्या झोपड्या उभारलेल्या होत्या, समुद्र किनारी उभारलेल्या झोपडी मध्ये पावसाचे पाणी व समुद्राचे पाणी उभारलेल्या झोपडीत आतमध्ये शिरुन त्यांचे नुकसान होत होते. झावळयाची झोपडी असल्याने माशांची व साहित्याची चोरी व्हायची, म्हणून स्वतःचे नुकसान टाळण्यासाठी मच्छिमारांनी पक्के बांधकाम केलेले आहे. हे बांधकाम शासनाच्या जागेमध्ये आहे. त्यामुळे उपविभागिय अधिकारी कुडाळ यांनी स्थानिक व्यवसायांना अनधिकृत ठरवत सीआरझेड मधुन बांधकाम काढण्याचा नोटीसा दिल्या आहेत. यामुळे मच्छिमारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तरी आमच्या व्यवसायाचे व आमच्या उदनिर्वाहाचे संरक्षण करण्यात यावे अशी मागणी मच्छिमारांनी केली. समुद्र किनारी असलेली जागा ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांची असुन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड जागा भाडेतत्वार देते अशी माहिती आम्हांला प्राप्त झाली आहे. तरी सदरील जागा भाडेतत्वावर भेटल्यास आम्ही व्यवसायिक जागेचे भाडे शासनाच्या ठरवून दिलेल्या भाड्यानुसार आम्ही भाडे भरण्यास तयार असल्याचेही मच्छिमारांनी म्हटले आहे.
दरम्यान, राणे कुटुंब नेहमीच मच्छिमारांच्या पाठीशी उभे राहिले असून यातुन देखील मच्छिमारांना निश्चितच बाहेर काढू, अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली.