दुचाकीस्वार जखमी: सामाजिक बांधिलकीतून तात्काळ मदत..
सावंतवाडी ता.२२-: आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास माजगाव गरड येथील संजू टायरसमोर एका दुचाकी अपघातात २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, नाक आणि कानातून रक्तस्त्राव होत होता.
सामाजिक बांधिलकी जपत रूपा गौंडर (मुद्राळे) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथील नागरिकांच्या मदतीने त्यांनी जखमी सौरभला रिक्षातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी त्यांनी रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांना रुग्णालयात बोलावून घेतले.
रुग्णालयात सौरभवर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्याची गंभीर प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्याला तात्काळ गोवा बांबुळी येथे हलवण्याचा सल्ला दिला. १०८ रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने रवी जाधव यांनी अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्याकडे विनंती केली. डॉ. ऐवळे यांनी त्वरित १०२ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, ज्यामुळे सौरभला पुढील उपचारांसाठी गोवा बांबुळी येथे पाठवता आले.
अपघातात जखमी झालेला सौरभ मालडकर हा नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी विठ्ठल मालडकर यांचा मुलगा आहे. या प्रसंगावधानी मदतीबद्दल मालडकर कुटुंबीयांनी डॉक्टर, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा गौंडर, रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांचे आभार मानले आहेत.
