मसुरे बीट हवालदार पी बी नाईक, हरिश्चंद्र जायभाय यांचा सामाजिक उपक्रम
मालवण (प्रतिनिधी) मसुरे पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या १४ गावांमध्ये सद्यस्थितीत कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या संचार बंदीची प्रभावी अंमलबजावणी करताना गोरगरीब जनतेस मदतीचा हातही देत आहेत. मसुरे येथील पोलीस हवालदार पी. बी. नाईक, कॉन्स्टेबल हरिश्चंद्र जायभाय यांनी मसूरे परिसरातील गरीब गरजू अशा निराधार १५ कुटुंबांना एक महिन्याचे पुरेल इतके जीवनावश्यक वस्तू देऊन एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या मसुरे येथील पोलीस बांधवांनी संचारबंदी कालावधीत गस्त अधिक वाढविली आहे. सुरुवातीला आठवडा बाजार पूर्णपणे बंद करीत नागरिक गर्दी करणार नाहीत याची खबरदारी घेतली. कोरोना संसर्ग कमी व्हावा यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करताना ही पोलीस मंडळी मदतकार्यातून सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडवत आहेत. लॉकडाऊन मुळे कुणाची उपासमार होऊ नये यासाठी मसूरे येथील पोलीस बांधव कार्यरत आहेत. मसूरे येथील सुमारे १५ गरीब गरजवंत कुटुंबांची लॉक डाऊन मुळे कठीण अवस्था झालेली होती. याची जाणीव होताच स्वखर्चाने या पंधरा कुटुंबांना एक महिना पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तू चे वितरण पोलीस बांधवांनी स्वखर्चातून केले आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर विश्वास साठे, ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण, कांदळगाव पोलीस पाटील शीतल उदय परब, होमगार्ड ओमकार पडवळ, सावंत, जितेंद्र परब, प्रदीप पाटकर, अनिता मयेकर, विमल भांडे, कल्पना मोरे, बबन परब, आनंदी सावत, समिधा मोरे, सिंधु बाईत, रजनी ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर म्हणाले, मसुरे पोलिस हे कायद्याचे पालन करून गावागावात योग्य ती सेवा गेली कित्येक वर्षे चांगल्या पद्धतीने देत आहेत. आजही येथील १५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांनी पोलीस दलातही एक माणुसकी जपणारे माणूस आहेत याचे उदाहरण दिले. मसुरे पोलिसांचे आजचे हे कार्य समस्त पोलीस दलाची मान उंचावणारी आहे. पोलिसांच्या या अनोख्या कार्याचा गौरव जिल्हा पोलिस प्रशासनाने ही घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
