⚡मालवण ता.२०-:
महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल खाते बदनाम होत आहे. लाच प्रकरणात जिल्ह्याबाहेरील व्यक्तींचा समावेश दिसून येत असून त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव बदनाम होत आहे. शुक्रवारी लाच स्वीकारतांना सापडून आलेले मसुरे तलाठी जिल्ह्याबाहेरील आहेत. अधिकाऱ्यांनी नियमात राहून सेवा द्यावी. जनतेला वेठीस धरून सुरु असलेले हे लाचखोरीचे प्रकार थांबलेच पाहिजेत, असे सांगत महसूल विभागाच्या कारभाराबाबत शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पैसे घेऊन जर कामे होणार असतील तर सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळणार कसा? एका तलाठ्यावर झालेल्या कारवाई नंतर प्रशासनाने बोध घ्यावा. गोरगरीब जनता, सर्वसामान्य व्यक्तींची कामे तत्परतेने झाली पाहिजेत हाच प्राधान्यक्रम असावा. पैसे देणाऱ्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचा प्रकारे आता बंदच झाला पाहिजे. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी यात विशेष लक्ष द्यावे. जे नियमानुसार आहे ते झाले पाहिजे. गोरगरिबांना फेऱ्या आणि खास व्यक्तीना अग्रक्रम हे थांबलेच पाहिजे, असे राजा गावडे यांनी म्हटले आहे.
वारस तपास व इतर आवश्यक दाखले मिळताना नागरिकांना काही ठिकाणी अनेकवेळा फेऱ्या माराव्या लागतात. याबाबत नागरिकांच्या तक्रारीही काही गावातून आहेत. कागदपत्रांची पूर्तता असेल तर असे होता नये. आज एका तलाठ्यावर झालेल्या कारवाई नंतर तरी यापुढे कामात सुधारणा असेल असे आम्ही गृहीत धरतो. मालवण तालुक्यात तसे न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन आमदार निलेश राणे यांच्याकडे संबंधित महसूल अधिकारी यांची तक्रार केली जाईल, असेही राजा गावडे यांनी सांगितले.