अखेर वनविभागाने दहा तासांच्या शर्थच्या प्रयत्नाने बिबट्याला केले जेरबंद…!

⚡सावंतवाडी ता.०७-: मळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चौघा ग्रामस्थांवर हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या त्या बिबट्याला अखेर वनविभागाने दहा तासांच्या शर्थच्या प्रयत्नाने सायंकाळी ६ च्या सुमारास जेरबंद केले. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला असून तो कुठल्याही प्रकारे जखमी किंवा आजारी नाही. त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी सांगितले.

काल रविवारी मळेवाड नजीकच्या कोंडूरे देऊळवाडी येथे भर दुपारी बिबट्याने वस्तीत शिरून चौघांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये प्रभाकर मुळीक (वय६०), सुर्यकांत सावंत (वय ६३), आनंद न्हावी (वय५४), पंढरी आजगावकर (वय५२) हे गंभीर जखमी झाले होते. सद्यस्थितीत त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू आहेत. याप्रकारानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ला केलेला बिबट्या हा यातील जखमी श्री‌. मुळीक यांच्या घरामागील बागेत लपल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. या बागेच्या चारही बाजूंनी पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यातून बाहेर जाणे बिबट्याला कठिण असल्याने तसा संशय व्यक्त केला होता. परंतु, रविवारी उशिरापर्यंत तो निदर्शनास आला नव्हता. वनविभागाने आज सकाळी पुन्हा एकदा उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याची शोधमोहीम हाती घेतली. आज सकाळी ८.३० वाजल्यापासून जखमी मुळीक यांच्या घरामागील बागेत वनविभागाची टीम दाखल झाली होती. यामध्ये वनक्षेत्रपाल सुहास पाटील, आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप, मळगाव वनपाल प्रमोद राणे, आजगाव, बांदा, मळगाव, माजगाव वन परिमंडळातील वन कर्मचारी तसेच कुडाळ आणि सावंतवाडी येथील जलद कृती दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते. शोधमोहीमेत हा बिबट्या मुळीक यांच्या बागेला लागून असलेल्या नदीच्या ठिकाणी मोटर पंपाच्या शेडमध्ये लपल्याचे निदर्शनास आले. यानंतर वनविभागाने दोन पिंजऱ्याच्या सहाय्याने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. यामध्ये पंपाच्या शेडचा दरवाजा खालून कट करून त्या ठिकाणी लोखंडी पिंजरा बसविण्यात आला. त्यानंतर शेडच्या पत्र्यावर चढून आतमध्ये पाणी ओतून त्याला हुसकावले. यानंतर बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. साधारण १० तासांच्या या पकडमोहीमेला सायंकाळी सहा वाजता यश आले. या मोहिमेत वनविभागाला स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. जेरबंद केल्यानंतर या बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतले. हा बिबट्या बिथरलेल्या अवस्थेत असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे वनक्षेत्रपाल श्री. पाटील यांनी सांगितले.

रविवारी बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्याला तात्काळ जेरबंद करा अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली होती. या मागणीचा विचार करता मळेवाड कोंडुरा उपसरपंच हेमंत मराठे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेसह ग्रामस्थांची मागणी त्यांच्या कानी घातली होती. पालकमंत्री यांनी या मागणीची दखल घेत तशा सुचना वनविभागाला दिल्या होत्या. वनविभागाने आज दिवसभर मोहीम राबवत बिबट्याला जेरबंद केल्यानंतर श्री. मराठे यांनी वनविभागासह पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले

You cannot copy content of this page