तालुकाप्रमुख रुपेश राऊळ : खासदार, पालकमंत्री देणार भेट_
*💫बांदा दि.३०-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात सर्वसामान्य लोकांच्या जेवणाचे हाल होऊ नये म्हणून बांद्यात कट्टा कॉर्नर येथे शिवसेनेच्यावतीने उद्यापासून म्हणजे शनिवार 1 मे पासून शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांनी बांदा येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बांदा शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर, विभागप्रमुख राजेश विरनोडकर, सुशांत पांगम, भैया गोवेकर, हनुमंत सावंत, ओंकार नाडकर्णी आदि उपस्थित होते. श्री. राऊळ पुढे म्हणाले की, जिल्हाभर शिवसेनेच्या माध्यमातून शिवभोजन थाळी उपक्रम सुरू करण्यात आला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ बांदा शहर व परिसरातील गरजूंना मिळावा यासाठी उद्या शनिवारी 1 मे पासून बांदा कट्टा कॉर्नर येथे शिवसेनेच्या माध्यमातून शिवभोजन थाळी केंद्र सुरू होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्य जनता ही लोकप्रिय आहे. त्यामुळे त्यांचे कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नये म्हणून गतवर्षी लॉकडाऊन काळात गरजूंसाठी शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली होती. याच अनुषंगाने बांद्यातही शिवभोजन थाळी उद्यापासून सुरू होणार असून सुमारे १०० गरजूंना याचा लाभ मिळणार आहे. शिवसेना बांदा शहर पदाधिकारी या योजनेसाठी कार्यरत राहणार असून बांदा कट्टा कॉर्नर येथील उदय येडवे यांच्या हॉटेलनजीक हे केंद्र सुरू होणार आहे. याचा बांदा शहर परिसरातील गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.राऊळ यांनी केले. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत उद्या या केंद्राला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ————— फोटो——– रुपेश राऊळ
