वर्धापनदिनानिमित्त उद्या होणार शुभारंभ:अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती
ओरोस ता ३०
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा १ जुलै रोजी ४२ वा वर्धापनदिन आहे. तसेच याच दिवशी कृषिदिन आहे. या निमित्ताने याच दिवशी जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जिल्हा बँकांत आर्थिक वर्ष संपल्यानंतर एवढ्या कमी कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणारी सिंधुदुर्ग जिल्हा बँक पहिली ठरली आहे. तसेच याचे औचित्य साधून ए आय या टेक्नॉलॉजीचा शुभारंभ करण्यात येत असून ए आय वापरणारी जिल्हा बँक राज्यात पहिलीच ठरणार आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष दळवी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक दिलीप रावराणे, विठ्ठल देसाई, महेश सारंग आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना दळवी यांनी, १ जुलै हा दिवस कृषी दिन साजरा केला जात असल्याने राज्यात मंगळवार पासून सहकार सप्ताह सुरू होत आहे. त्यामुळे जिल्हा बँकांच्या सर्व शाखांच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येणार आहे. तसेच विविध विकास संस्थांच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.