सिंधुदुर्गात आनंदोत्सव:कार्यक्रमाचे जिल्ह्यात होणार थेट प्रक्षेपण:जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती..
ओरोस ता ३०
खा नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे. परंतु राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुपुत्राला अद्याप मिळालेले नाही. ती उणीव रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने भरून निघणार आहे. मंगळवारी १ जुलै रोजी त्यांची भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा होणार आहे. हा सन्मान जिल्ह्यासाठी भूषण आहे. याचा प्रत्येक सिंधुदुर्ग वासियांना अभिमान आहे, असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेतील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष श्री सावंत बोलत होते. यावेळी पुढे बोलताना सावंत यांनी, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदी रवींद्र चव्हाण यांच्या निवडीची पूर्तता झालेली आहे. सोमवारी दुपारी १ ते ४ या वेळेत यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल होणार आहे. यासाठी संघटनेचे राज्य परिषद प्रतिनिधी मतदान करणार आहेत. मंगळवारी दुपारी पर्यंत ही निवड जाहीर होईल. रवींद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्ष निवडीला विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुमोदन दिलेले आहे. या निवडी वेळी भाजपचे राज्यातील हजारो पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मंगळवारी तालुकास्तरावर केले जाणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी यांच्या नियोजनासाठी व्हीसी नियोजित केली आहे. प्रदेशाध्यक्ष निवडी नंतर रवींद्र चव्हाण जिल्ह्यात आल्यावर त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. महाराष्ट्रात भाजपचे दीड कोटी सदस्य आहेत. तसेच केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. अशा एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण होत असल्याने त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. परिणामी पूर्ण जिल्हाभर आनंदोत्सव आहे, असेही यावेळी श्री सावंत यांनी सांगितले.