⚡कणकवली ता.२७-: कोकण सुपुत्र तथा मराठी नाट्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक उदय जाधव लिखित ‘ गार्गी आणि इतर एकांकिका’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार 29 जून रोजी रात्री आठ वाजता मुंबई प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे अकादमी रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मय सुमित यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी आणि नाटककार अजय कांडर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
उदय जाधव हे मराठी रंगभूमीवरील लक्षवेधी तरुण दिग्दर्शकांपैकी एक महत्त्वाचं नाव असून त्यांचे ‘ देवानंप्रिय असोक’ हे आपल्या मूळ परंपरेचा शोध घेणारे वेगळे नाटक बहुचर्चित ठरले आहे. सम्राट अशोकाच्या विषयावर, अभिव्यक्ती आणि कलात्मक स्वातंत्र्याचा गैरफायदा न घेता. इतिहासाशी प्रतारणा न करता तो वास्तववादी रंगभूमीवर नाटकं रूपाने मांडणं. हे एक मोठे आव्हान होते हे आव्हान उदय जाधव यांनी यशस्वीरित्या पेलले आहे. तथापि या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोगही या प्रकाशन सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आला आहे. प्रतिमा पब्लिकेशन पुणेतर्फे गार्गी आणि इतर एकांकिका हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून या प्रकाशन सोहळ्याला तसेच यानंतर होणाऱ्या नाट्यप्रयोगाला रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.