⚡मालवण ता.२४-:
जल जीवन मिशन अंतर्गत टप्पा-३ (स्तर-३) मध्ये समाविष्ट पात्र ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींना उद्देशून, पंचायत समिती मालवणच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे पार पडले. या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि जेपीएस फाउंडेशन, लखनौ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी जल स्रोतांचे योग्य व्यवस्थापन व संवर्धन हे भविष्यासाठी अत्यावश्यक आहे, यामुळे प्रत्येक घरात स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पोहोचण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, असे स्पष्ट केले.
यावेळी तज्ज्ञ नचिकेत पवार यांनी समुदाय आधारित जल स्रोत व्यवस्थापन, समित्यांचे कार्य आणि जबाबदाऱ्या तसेच भूजल संशोधनाच्या विविध तांत्रिक पद्धतींबाबत सखोल माहिती दिली. जयराम जाधव यांनी जल जीवन मिशनची उद्दिष्टे, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचे स्रोत, संकल्पना व साठवणूक या बाबींचे सविस्तर मार्गदर्शन केले. मंगेश नेवगे यांनी भूजल पुनर्भरणाच्या पारंपरिक आणि अपारंपरिक पद्धती, त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज आणि स्थानिक पातळीवरील उदाहरणांद्वारे जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रशिक्षणात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, बचतगट प्रतिनिधी, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या दोन दिवसीय प्रशिक्षणातून सहभागी प्रतिनिधींमध्ये जल स्रोत बळकटीकरण, शाश्वतीकरण आणि जल स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली असून, ग्रामस्तरावर जल जीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचा निर्धार घेण्यात आला.