वायरी भूतनाथ, चिंदर, आचरा या ग्रामपंचायतींना कायमस्वरूपी ग्राम अधिकारी द्यावा…

काँग्रेसची मागणी: गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर..

⚡मालवण ता.२४-: मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीसह चिंदर व आचरा ग्रामपंचायतीला कायम स्वरूपी ग्राम अधिकारी मिळावा, अशी मागणी यासाठी आज वायरी भूतनाथ व चिंदर – आचरा विभागातील काँग्रेस पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. श्याम चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

वायरी भूतनाथ, आचरा, चिंदर येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि वायरी ग्रामपंचायत माजी सरपंच देवानंद लुडबे, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोंडकर, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, मालवण तालुका सरचिटणीस तथा चिंदर ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, वायरी भूतनाथ ग्रामपंचायत उपसरपंच प्राची माणगावकर, युवक काँग्रेसच्या जिल्हा सचिव पल्लवी तारी – खानोलकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, विठ्ठल तळवडेकर, पराग माणगावकर, दिलीप तळगावकर, बाबू चव्हाण यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

मालवण तालुक्यात प्रामुख्याने वायरी भूतनाथ, चिंदर, आचरा या जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींसह मालवण तालुक्यातील इतरही ग्रामपंचायत मध्ये असलेल्या ग्राम अधिकारी यांच्याजवळ दोन ते तीन ग्रामपंचायतचा कार्यभार दिला आहे.
यामुळे आठवड्यातील एक दिवस हे ग्राम अधिकारी उपलब्ध असतात व इतर दिवशी अन्य ग्रामपंचायत ठिकाणी गेलेले असतात. त्यामुळे या ग्रामपंचायत मध्ये विविध दाखले, कामांसाठी येणारे नागरिक हतबल होतात. वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याविषयी काही नागरिकांनी या ग्रामपंचायतीमधील सदस्यांजवळ आपल्या तक्रारी मांडल्या आहेत, असे सांगत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी श्री. श्याम चव्हाण यांच्या सोबत चर्चा केली. याबाबत तत्परतेने लक्ष घालून येत्या काही दिवसात कायम स्वरूपी ग्राम अधिकारी देणार असल्याचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page