५५ लाख ७५ हजाराची पकडली दारू…

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची सिंधुदुर्गनगरी येथे कारवाई

⚡ओरोस ता २१-: सिंधुदुर्गनगरी येथील हॉटेल राजधानी समोरील हायवे रोडवर अशोक लेलैंड कंपनीच्या टेम्पोमधुन गोवा बनावटीची दारु वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे. 55 लाख 75 हजार 680 रुपये किमतीची दारुसह वाहन व चालक राघोबा रामचंद्र कुंभार, वय-35 वर्षे, रा. पेडणे, माऊसवाडी याला ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ही धडक कारवाई केली आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेची दोन विशेष पथके गोवा बनावटीच्या दारु वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली होती. ही दोन्ही पथके सावंतवाडी उपविभागात शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असता गोपनीय पद्धतीने पोलीस उपनिरीक्षक समिर भोसले यांना अशोक लेलॅण्ड कंपनीचा टेम्पो क्रमांक DD-01-AA-9648 मधून गोवा येथून मुंबईचे दिशेने वाहतूक करुन घेवून जात असल्याबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची दोन्ही पथके राजधानी हॉटेल, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे दबा धरुन बसलेली असताना अशोक लेलॅण्ड कंपनीचा टेम्पो क्रमांक DD-01-AA-9648 तेथे आला. या टेम्पोला थांबण्याचा इशारा करुन त्यास थांबवुन त्याचेकडे गाडीतील मालाबाबत विचारणा करता त्याने प्रथम असंबंधित उत्तरे दिली. त्यामुळे त्याला अधिक विश्वासात घेवून विचारले असता त्याने गाडीमध्ये गोवा बनावटीचे दारुचे बॉक्स असल्याचे सांगितले.
सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील मिलिंद राणे यांच्या सांगण्यावरून चालक संशयित आरोपी राघोबा रामचंद्र कुंभार, वय-35 वर्षे, रा. पेडणे, माऊसवाडी, घर नं.509, ता.पेडणे, राज्य-गोवा याने मिलिंद राणे यांच्या मालकीच्या गाडीतून गोवा बनावटीची दारुवाहतुक करीत होता. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (अ), (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या अशोक लेलॅण्ड कंपनीचा टेम्पोची किंमत 25 लाख रुपये असुन 55 लाख 75 हजार 680 रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु असा एकुण 80 लाख 75 हजार 680 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, पोलीस उपनिरीक्षक समिर भोसले, गणेश कऱ्हाडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, सुरेश राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, प्रकाश कदम, किरण देसाई, बस्त्याव डिसोझा, जॅक्सन घोन्साल्वीस पोलीस कॉन्स्टेबल- महेश्वर समजिस्कर यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page