⚡सावंतवाडी ता.१९-: शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. विकासभाई सावंत यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आणि गणवेश वाटप (२० जून २०२५)
शुक्रवार २० जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या नवरंग कलामंच येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच, संस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना गणवेशांचे वितरणही केले जाणार आहे. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीने नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याचे आवाहन केले आहे.
भव्य बुद्धिबळ स्पर्धा (२२ जून २०२५)
श्री. विकासभाई सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील (सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला) २१ वर्षांखालील मुला-मुलींसाठी भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. २२ जून रोजी सकाळी ९:३० वाजता राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन स्वतः विकासभाई सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या नियमांनुसार स्विस लीग राउंड पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाईल. स्पर्धेदरम्यान त्याचे नियम आणि वेळापत्रक जाहीर केले जाईल. या स्पर्धेत एकूण १६ बक्षिसे दिली जाणार आहेत, ज्यात १४ गटांतील आणि २ विशेष बक्षिसांचा समावेश आहे. नामदार भाईसाहेब सेवा प्रतिष्ठान या स्पर्धेचे आयोजन करत असून मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री. कौस्तुभ पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तरी जास्तीत जास्त संख्येने युवा खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.