हिंदी भाषा सक्तीविरोधात कणकवलीत मनसेचे आंदोलन…!

⚡कणकवली ता.१९-:
राज्य शासनातर्फे हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गुरुवारी सकाळी येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात आंदोलन छेडण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषा सक्तीविरोधात व मराठी भाषेच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. राज्य शासनाचा हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा मनसै निकांनी दिला.

मनसे कार्यकर्त्यांनी ‘हिंदी भाषेची सक्ती करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘माय मराठी जिंदाबाद’, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो’, अशी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माजी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री म्हणाले, राज्य सरकारच्या १७ जूनच्या आदेशामध्ये हिंदी भाषा राज्यात अनिवार्य असल्याचा उल्लेख आहे. महाराष्ट्रात पाचवीपासून हिंदी शिकविली जात असतानाही आता पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा घाट का घातला जातोय? यातून हिंदीची सक्ती करण्याचा सरकारचा डाव लक्षात असून त्याचा आमचे नेते राज ठाकरे यांनी यथेच्छ समाचार घेतला आहे. अशा सक्तीला मनसे भिक घालणार नाही. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आम्ही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू. राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेले पत्र आम्ही सर्व शाळांमध्ये पोहोचविणार आहोत. मराठी हीच आमची मातृभाषा असून त्यावरील अतिक्रमण खपवून घेणार नाही, असे मेस्त्री म्हणाले.

यावेळी मनसे माजी उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गांवकर, जिल्हा सचिव अनंत आचरेकर, तालुकाध्यक्ष शांताराम सादये, उपतालुकअध्यक्ष अतुल दळवी, माजी तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, मनविसे जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे, मनविसे तालुकाध्यक्ष समीर तेली आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page