लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून पुढील होणारा अनर्थ टाळावा; ग्रामस्थांची मागणी..
⚡बांदा ता.१७-: मळेवाड गावात बऱ्याच ठिकाणी विद्युत वाहिन्या व खांबावर झाडी तसेच वेलिंची वाढ झाल्याने ते धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे वादळी पावसात याठिकाणी विजेचा लपंडाव सुरु असतो. गावातील चराटकरवाडी येथे खांबावरील तारा या जमिनीवर लोंबकळत आहेत. फ्युज देखील तुटलेल्या स्थितीत असून त्याला चक्क काठीचा आधार देण्यात आल्याने महावितरणच्या अजब कारभाराविरोधात आश्चर्य व्यक्त होत आहे.
एखाद्या वेळी अशा प्रकारची घटना निदर्शनास आणली की, नेहमी प्रमाणे “करतो” हेच उत्तर असते मात्र वेळोवेळी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
सध्या पावसाचे दिवस असून या पोलच्या बाजूला शेतकऱ्यांची शेती असून येथून पुराचे पाणी वाहत असते. वस्ती असल्याने लहान मुले, शेतकरी, ग्रामस्थ यांची सतत ये-जा असते. या पोलवरील तारा तुटलेल्या काठीचा आधार दिलेल्या फ्यूज बदलायला महावितरणकडे लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. महावितरण एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट बघत आहे का असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. लवकरात लवकर याबाबत योग्य ती कार्यवाही करून पुढील होणारा अनर्थ टाळावा अशी मागणी होत आहे.
फोटो:-
मळेवाड येथे धोकादायक स्थितीत असलेल्या फ्युज कंडक्टरला काठीचा आधार देण्यात आला आहे.