कृषि समिती सभेत मागणी नुकसान झाल्यास प्रशासन जबाबदार
*💫सिंधुदुर्गनगरी दि. २८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्या गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तरी नद्यांमधील गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा. त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि डिझेल उपलब्ध करून द्यावे. असा ठराव आजच्या कृषी समिती सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद कृषी समितीची सभा सभापती तथा जि.प.उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुधीर चव्हाण, सदस्य रणजीत देसाई, अमरसेन सावंत ,वर्षा पवार, अनुप्रिती खोचरे, संजय देसाई आदी सदस्य, खाते प्रमुख सहभागी झाले होते. आजच्या कृषी समिती सभेत जिल्ह्यातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्या ने पावसाळ्यात पूर येऊन नद्यांचे पाणी शेती-बागायती मध्ये जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा झाली. यावेळी सभापती राजेंद्र म्हापसेकर, यांनी हा विषय आपण यापूर्वी जिल्हा नियोजन समितीमध्ये उपस्थित केला होता. मात्र याबाबत पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतलेली नाही. या गंभीर प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे असा आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत केला. नदयातील गाळामुळे भविष्यात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. गाळ काढ़ ण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि डिझेल उपलब्ध करून द्यावे .असा ठराव आजच्या कृषी समिती सभेत घेण्यात आला. आंबा काजू पिकाची नुकसान भरपाई मिळावी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि वारंवार बदलत्या हवामानामुळे यावर्षी आंबा आणि काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी काजू आणि आंब्याचे ५० टक्के ही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागलेले नाही .तसेच बदलत्या तापमानामुळे दर्जेदार आंबा फळे व काजू बी मिळालेली नाही .त्यामुळे या पिकाला दरही मिळाला नाही. तरी शेतकऱ्यांच्या झालेल्या आंबा आणि काजू पीक नुकसानीची भरपाई मिळावी .असा ठराव सभेत करण्यात आला. आठवड्याभरात खत आणि भात बियाणे उपलब्ध होईल येत्या खरीप हंगामासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले ७ हजार ९७५ क्विंटल सुधारित व संकरित भात बियाणे आणि १७ हजार ५७० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी ५० टक्के खत आणि बियाणे या आठवड्यात उपलब्ध होईल .अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी सुधीर चव्हाण यांनी सभेत दिली.
