आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जास्तीत जास्त सदस्यांना निवडून आणणार…

कोकण विभाग बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा निर्धार..

⚡मालवण ता.०८-:
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या ग्रामीण पातळीवरील पदाधिकाऱ्यांना निर्णय घेऊ द्यावेत, तसेच स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास दिल्या गेल्या पाहिजेत अशा मागण्या काँग्रेसच्या कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी करत स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त सदस्यांना निवडून आणण्यावर भर देणार असल्याचा निर्धार व्यक्त केल्याची माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव कोकण विभागाचे सहप्रभारी यु. बी. व्यंकटेश यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या दादर – मुंबई येथील टिळक भवन कार्यालयात कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपालिका निवडणूका व संघटनात्मक बाबी बाबत पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, विरार – वसई, भिवंडी, ठाणे, भाईंदर येथील पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभा व विधानसभा झालेल्या निवडणूकामध्ये आघाडी असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांनी प्रामाणिकपणे काम केले. परंतु कोकण विभागात आपल्या पक्षाचा उमेदवार नसल्याने आपल्या काँग्रेस पक्षाच्या हात निशाणीला घराघरात व नवमतदारांमध्ये पोहचविण्यात आपण कमी पडलो. देश व राज्य पातळीवर झालेल्या निवडणूकांपर्यंत ठीक होते, मात्र आता ग्रामीण पातळीवर पदाधिकाऱ्यांना निर्णय घेऊ द्यावेत असे मत यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मांडले. भविष्यात जर नव मतदारांना काँग्रेसकडे वाळवायचे असेल तर स्थानिक निवडणूका या काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आपल्या कार्यकर्त्यांना लढवण्यास दिल्या गेल्या पाहिजेत. अन्यथा आघाडी आघाडी करून नंतर आपण कुठेतरी कमी राहू का ? अशी शंका येत असल्याचे मत देखील पदाधिकाऱ्यांनी मांडले, असे अरविंद मोंडकर यांनी म्हटले आहे.

राज्यातील काँग्रेस पक्षाच्या खासदाराना विशेषतः कोकणात जिल्हानिहाय जबाबदारी द्या, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. होणाऱ्या स्थानिक निवडणूकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त सदस्यांना निवडून आणण्यावर भर देणार असंल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच येत्या काही दिवसात यु.बी. व्यंकटेश हे जिल्हा प्रभारी अजिंक्य देसाई याच्या सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असून तालूकानिहाय दौरा करत पदाधिकारी कार्यकर्त्यां सोबत चर्चा करणार आहेत, अशी माहितीही अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page