साडेआठ लाखांचे चोरीस गेलेले ५४ मोबाईल परत मिळविण्यास पोलिसांना यश…

सायबर क्राईम विभागाचा यशस्वी शोध:पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी मूळ मालकांना मोबाईल केले परत..

ओरोस ता ७
जिल्ह्याच्या सायबर पोलीसानी १६ ते ३१ मे २०२५ या कालावधीत राबविलेल्या विशेष मोहीम अंतर्गत केंद्र सरकारने उपलब्ध केलेल्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) च्या माध्यमातून तब्बल ८ लाख ४० हजार रुपये किंमतीचे चोरीस गेलेले अथवा गहाळ झालेले ५४ मोबाईल परत मिळविले आहेत. मिळालेले मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हैदराबाद, केरळ वगैरे राज्यातून तसेच महाराष्ट्रातील मुंबई, रत्नागिरी, पालघर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमधून सिंधुदुर्ग पोलीसांनी हे मोबाईल रिकव्हर करुन परत आणलेले आहेत.
आतापर्यंत सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) या पोर्टलवर 2019 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1090 तक्रारी प्राप्त झालेल्या असून पैकी 48 लाख 75 हजार किंमतीचे 325 मोबाईल तक्रारदार यांना परत करण्यात आलेले आहेत. उर्वरित प्राप्त चोरी, गहाळ, हरविलेल्या मोबाईलचा शोध घेणेसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, उपपोलीस निरीक्षक सुरज पाटील यांचे नेतृत्वात सायबर पोलीस ठाणे स्तरावर व पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथके तयार करण्यात आलेली होती.
या पथकामार्फत १६ ते ३१ मे २०२५ या कालावधीमध्ये मोबाईल ट्रेस व रिकव्हर करणेकरिता विशेष मोहिम राबविण्यात आली होती. सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक तपास करुन प्राप्त तक्रारीपैकी 54 मोबाईल विशेष प्रयत्न करुन ट्रेस करण्यात यश मिळविलेले आहे. ट्रेस करण्यात आलेल्या मोबाईल पैकी 8 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 54 मोबाईल हे दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हैदराबाद, केरळ वगैरे राज्यातून तसेच महाराष्ट्रातील मुंबई, रत्नागिरी, पालघर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमधून सिंधुदुर्ग पोलीसांनी रिकव्हर करुन परत आणलेले आहेत.

You cannot copy content of this page