सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…!

२०२३-२४ साठी कोकण विभागातून कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला जाहीर..

⚡ओरोस ता ६-: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन, मुंबई याचे मार्फत २०२३-२४ करीता दिला जाणारा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाला असुन महाराष्ट्रातील जिल्हा बँकांसाठी हा मानाचा पुरस्कार मानला जातो. २०२३-२४ करीता कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मिळाला आहे.
कै. वैकुंठभाई मेहता हे भारतीय सहकारी चळवळीचे प्रणेते होते. त्यांनी बॉम्बे स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजे आताची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुमारे ३५ वर्षे कामकाज सांभाळले. ही बँक म्हणजे मुंबई व राज्यातील ग्रामीण पुनर्रचना कार्याचे केंद्र बनवले. वैकुंठ मेहता यांचे जीवन म्हणजे सहकारी चळवळ व ग्रामोद्योग यांच्या विकासार्थ देशासाठी सेवारत झालेले शांत समर्पणाचे उत्कृष्ट उदाहरण होय. म्हणूनच त्यांच्या नावाने जाहीर होणार या पुरस्काराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक असोसिएशन, मुंबई यांच्यामार्फत दिला जातो. ऑक्टोबर १९३९ साली बँक्स असोसिएशनची स्थापना ही महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँका या सहकार क्षेत्रातील बँकांच्या कामकाजात समन्वय साधण्यासाठी केली गेली.
जिल्हा बँकेने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत असतानाच ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, स्वनिधी, कर्ज वसुली, ढोबळ व निव्वळ नफा यामध्ये बँकेने लक्षणीय प्रगती केली आहे. बँकेने २०२४-२५ साठी ६००० कोटीच्या व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवले होते. बँकेने यावर्षी एकूण ६०९४.७५ कोटीच्या व्यवसायाच्या टप्पा गाठून या उद्दिष्टांची पुर्तता केली आहे. अत्याधुनिक डिजिटल बँकिंग सेवेमध्ये सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने आपल्या स्तरावर कायमच उंचावत ठेवलेला असून ग्राहकाकडून डिजिटल सेवांना मिळणारा वाढता प्रतिसाद ही त्याची पोच पावती आहे. विशेषतः मायक्रो एटीएम्, डोअर स्टेप बँकींग या सुविधा उपलब्ध करुन देत ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्या सक्षम करण्यासाठी बँकसखी सारखी वैशिष्ट्यपुर्ण योजना यशस्वीपणे रा‌विली जात आहे. बँकेच्या व्यवहारातील पारदर्शकता प्रतिबिंबित करणारा विविध लेखापरिक्षणातील मिळणारा ‘अ’ वर्ग गेली अनेक वर्ष कायम राखण्यात बँकेला यश मिळाले आहे.

चौकट
जिल्हा बँकेच्या पारदर्शक कारभारामुळे जिल्हावासियांच्या मनात विश्वासाचे नाते तयार झाले असून जिल्ह्याच्या विकासामध्ये सिंधुदुर्ग बँकेचा सिंहाचा वाटा आहे. बँकेस मिळालेल्या या पुरस्कारामुळे बँकेने साधलेली सर्वांगीण प्रगती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

कोट
बँकेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये बँकेच्या सभासद संस्थांबरोबरच बँकेचे संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम पूर्व केलेल्या प्रयत्नांचा मोठा सहभाग आहे. बँकेचे कर्जदार, ठेवीदार, ग्राहक यांचा बँकेवर असलेला अतुट विश्वास तसेच कर्जदारांनी कर्ज परतफेढीसाठी केलेले सहकार्य यामुळे बँकेची नियमित आर्थिक प्रगती होत आहे. त्यामुळे जिल्हा बँकेशी संलग्न असलेल्या सर्व घटकांचे बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करून बँकेच्या पुढील वाटचालीमध्ये या सर्वांचे असेच मोलाचे सहकार्य लाभेल असा विश्वास व अपेक्षा व्यक्त केली आहे.

You cannot copy content of this page