प्लास्टिक प्रदूषण मुक्तीला प्राधान्य:
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती..
ओरोस ता ५
५ जून या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या माध्यमातून महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्लास्टिक पासून होणारी प्रदूषण मुक्ती याला प्राधान्य देवून जनजागृती करण्यात येणार आहे. शाळा व सरकारी कार्यालये येथे वृक्ष लागवडी बरोबरच प्लास्टिक बंदीचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमार्फत प्लास्टिक वापर बंदीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील वसंत स्मृती या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री सावंत बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक राजन चिके, प्रदेश उपाध्यक्ष डॉ भाई बांदकर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, सरचिटणीस गुरुनाथ पाटील, महेश संसारे, वैभव शेणे, उदय सावंत, महादेव सावंत आदी उपस्थित होते. भाजपच्या किसान मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे यावेळी श्री सावंत यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष श्री सावंत यांनी, जगातील १४३ देशांत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. त्याप्रमाणे भारतात सुध्दा हा दिवस साजरा केला जातो. भाजप दरवर्षी हा कार्यक्रम एक थीम घेवून साजरा करते. त्यानुसार यावर्षी प्लास्टिक प्रदूषण मुक्ती ही थीम यावर्षी निवडण्यात आली आहे. आज जिल्हा कार्यालय परिसरात पक्षाचे नेते अतुल काळसेकर यांच्याहस्ते वृक्षारोपण करून याची सुरुवात करण्यात आली आहे. गतवर्षी शाळांच्या माध्यमातून भाजपने १२ हजार वृक्षांचे रोपण केले होते. यावर्षी शाळा १६ जून रोजी सुरू होत असल्याने शाळा सुरू झाल्यावर वृक्षारोपण कार्यक्रम सुरु होणार आहे. यावर्षी माध्यमिक शाळांतील पाच मुलांचा एक गट तयार करून वृक्षारोपण करतानाच त्याच्या संगोपणाची जबाबदारी त्यांच्यावर देणार आहोत. या शिवाय भाजपच्या एका कार्यकर्त्याची नियुक्ती या ठिकाणी करून तो खत आणि लागणारे साहित्य पुरवून लक्ष ठेवणार आहे, असे सांगितले.
वेंगुर्ले येथे कासव संगोपनाची मोठे काम सुरू आहे. त्यामुळे यासाठी लागणारे साहित्य त्यांना पुरवून यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार आहे. यातून समुद्री जैवविविधता जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही यावेळी श्री सावंत यांनी सांगितले.
चौकट
जिल्ह्यातील शहरी भागातील प्लास्टिक उचलले जाते. परंतु ग्रामीण भागात याला प्राधान्य दिले जात नाही. शिवाय ग्रामीण भागात प्लास्टिक वापर वाढला आहे. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांत याबाबत जनजागृती केली जाणार आहे. डॉ भाई बांदकर यांच्या माध्यमातून मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. शाळेत येता जाताना किंवा राहत असलेल्या परिसरात मिळणारे प्लास्टिक विद्यार्थ्यांनी जमा करावे, अशी विनंती केली जाणार आहे. शाळा शाळांतून जमा झालेले हे प्लास्टिक आम्ही गाडीने सावंतवाडी येथे विकणार आहोत. शाळेच्या मुलांसाठी तेथील व्यवस्थापनाने एक रुपया जादा किलोमागे देण्याचे मान्य केले आहे. अशाप्रकारे महिनाभर हे अभियान सुरू राहणार असल्याचे यावेळी श्री सावंत यांनी सांगितले.
चौकट
मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ९ जून ते ९ जुलै या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. २३ जून रोजी शामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. २५ जून रोजी आणीबाणी हा काळा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त भाजप हा दिवस का साजरा केला जातो, याची माहिती देणार आहे, असे श्री सावंत यांनी सांगितले.
फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी:
