रुपेश राऊळ यांचे संजू परब यांना खुले आव्हान: मळगाव घाटात गॅस पाईपलाईनच काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा…
*⚡सावंतवाडी ता.०३-:* स्वतःचे लोकप्रतिनिधी सक्षम नसल्याने आज त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. परंतु संजू परब यांनी नौटंकी न करता हिम्मत असेल तर त्यांनी आक्रोश मोर्चा काढून आपल्या लोकप्रतिनिधींचे अपयश जनतेसमोर आणून दाखवावे असे, आवाहन ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केले.
दरम्यान आजपर्यंत सत्ताधाऱ्यातील नेत्यांनी शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आपुलकी आहे असे वारंवार सांगितले. परंतु ती आपुलकी त्यांची फक्त बोलण्यापूर्ती राहिली आहे अशी टीका देखील यावेळी राऊळ यांनी केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना शाखेत बोलत होते.
श्री राऊळ पुढे बोलताना म्हणाले की अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु या सर्व गोष्टीवर प्रशासन कुठे आहे ? हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. तसेच मळगाव घाटात देखील काही दिवसांपूर्वी गाडी स्लीप होऊन अपघात देखील घडला होता. यात एका दुचाकी स्वाराचा देखील मृत्यू झाला होता. परंतु हा अपघात त्या ठिकाणी गॅस पाईपलाईनच्या खोदाईमुळे माती रस्त्यावर आल्याने घडून मृत्यू झाल्याचं दिसून आले आहे. त्यामुळे सदर ठेकेदाराच्या भोंगाळ कारभारा विरोधात गुन्हा दाखल नसल्याने त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे देखील राऊळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
