⚡कणकवली ता.३१-: गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीपोटी शेतकरी, नुकसानग्रस्तांना अद्याप १ कोटी ३१ लाखांची रक्कम येणे आहे. खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत प्रशासनाने ही माहिती सादर केली आहे. आम्ही जनतेच्या हिताच्या दृष्टीने प्रश्न मांडतो, त्यांच्या समस्यांना वाचा फोडतो. केवळ विरोधासाठी विरोध हे आमचे काम नाही. आमची भूमिका योग्यच होती, हे प्रशासनाच्या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. आता ही रक्कम शेतकरी, नागरिकांना लवकरात लवकर मिळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे माजी आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
पालकमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली पण यापूर्वी गेल्या दोन वर्षांत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही खासदार न आल्याने जनता त्यांची वाट पाहत असल्याचे आम्ही म्हटले होते. त्यानंतर खासदारांनी शुक्रवारी जिल्हयात येत आढावा घेतला, असे त्यांनी म्हटले आहे.
