मान्सून सुरू होण्यापूर्वी हा रस्ता पूर्ववत न बनवल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन; ग्रामस्थांचा इशारा..
⚡बांदा ता.२४-: बांदा-सटमटवाडी रस्ता ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अपूर्ण राहिल्याने अवकाळी पावसात हा संपूर्ण रस्ता चिखलमय बनला आहे. या रस्त्यावरून वाहतूक तर सोडाच पण चालणेही मुश्किल बनल्याने सटमटवाडी ग्रामस्थ आक्रमक बनले आहेत. मान्सून सुरू होण्यापूर्वी हा रस्ता पूर्ववत न बनवल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.
बांदा ते डिंगणे गाळेल हा रस्ता ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आला होता. या कामाची सुरुवात मार्च महिन्यात करण्यात आली. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व वेळकाढू धोरणामुळे या रस्त्याचे काम धिम्या गतीने सुरू झाले. सटमटवाडी ग्रामस्थांनी या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र ठेकेदाराने न जुमानता या रस्त्याचे काम अपूर्ण ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याबाबत लोकप्रतिनिधीचे देखील लक्ष वेधण्यात आले. या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावे असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी ठेकेदाराला दिले होते.
त्यानंतर तात्काळ कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र काही दिवसातच पुन्हा ठेकेदाराने काम बंद केले. पूर्वमोसमी पावसाने जिल्ह्यात गेल्या चार दिवसात हाहाकार माजवल्याने याचा फटका या रस्त्याला देखील बसला. संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणे तर सोडाच पण साधे चालणे मुश्किल झाल्याने सटमटवाडी ग्रामस्थ हवालदील झाले आहेत. पहिल्याच पावसात रस्त्याची ही अवस्था झाल्याने संपूर्ण पावसाळ्यात ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे. या रस्त्याबाबत तात्काळ कार्यवाही न केल्यास ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
