बांदा-वाफोली रस्ता चिखलमय…

वेळोवेळी निवेदने देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कानाडोळा:कार्यवाही न झाल्यास प्रसंगी रस्त्यावर चिखलात बसून आंदोलन; डॉ. संजय सावळ..

⚡बांदा ता.२३-: वाफोली, विलवडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या काळ्या दगडाच्या खणीतून पावसात देखील डंपर मधून वाहतूक सुरु असल्याने बांदा-वाफोली रस्ता चिखलमय बनला आहे. वेळोवेळी निवेदने देऊन तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही कानाडोळा होत असल्याने याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत वेळीच कार्यवाही न झाल्यास प्रसंगी रस्त्यावर चिखलात बसून आंदोलन करण्याचा इशारा डॉ. संजय सावळ यांनी दिला आहे.

डॉ. सावळ म्हणाले की, बांदा वाफोली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डंपर वाहतूक सुरु आहे. काळ्या दगडाच्या खाण मालकांची अनेकवेळा बैठक घेऊन त्यांना खडी तसेच काळ्या दगडाच्या वाहतुकीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरु असून यादरम्यान डंपर वाहतूक बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र भर पावसात देखील डंपर वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.

या रस्त्यावरून वाहतूक करणे विशेषतः दुचाकीचालकांना धोकादायक बनले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील चिखल निदर्शनास येत नसल्याने अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. याबाबत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी ईमेल करून तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र याबाबत कोणीच कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पावसाळ्यात आंबोली येथे जाण्यासाठी हा जवळचा पर्यायी रस्ता असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येत्या दोन दिवसात याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास प्रसंगी चिखलात बसून आंदोलन करण्याचा इशारा डॉ. सावळ यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page