माड्याचीवाडी विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

विविध नृत्याविष्कारानी कार्यक्रमात रंगत..

कुडाळ : एस. के. पाटील शिक्षक प्रसारक मंडळ (पाट) संचलित माड्याचीवाडी माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्याविष्काराने हा कार्यक्रम रंगतदार ठरला.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भागिरथ प्रतिष्ठान (झाराप) चे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, एस. पी. के. कॉलेज (सावंतवाडी) चे प्राणी शास्त्र विभागप्रमुख प्रा. गणेश मर्गज, माजी मुख्याध्यापक रामचंद्र ठाकूर, संस्था चेअरमन समाधान परब, माड्याचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे, संस्था उपाध्यक्ष डी. ए. सामंत, मालवण नगरपरिषदेचे नगरसेवक श्री.पाटकर, शिवसेना (शिंदे पक्षा)चे कुडाळ तालुकाध्यक्ष अरविंद करलकर, विनायक प्रभू, सुधीर ठाकूर, पाट हायस्कूलचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, संस्था चालक राजेश सामंत, हुमरमळा ( वालावल) सरपंच अमृत देसाई, तेंडोली सरपंच अनघा तेंडुलकर, सुंदर गावडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मृदगंध’ या त्रेमासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक अनंत सामंत यांनी प्रस्ताविक केले. सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रशालेचे कर्मचारी सुनील म्हापणकर यांचा मुलगा भूषण म्हापणकर याने दत्ता सामंत यांचे काढलेले स्केच त्यांना भेट म्हणून दिले. त्यानंतर दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आयबीटीमध्ये चांगले काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक अनंत सामंत व माजी मुख्याध्यापक रामचंद्र ठाकुर यांनी जाहीर केलेला ‘श्रम गौरव’ पुरस्कार दहावीचा विद्यार्थी वेदांत राऊळ व विद्यार्थीनी शुभांगी वारंग यांना देण्यात आला. तसेच आठवी,नववी व दहावीमध्ये प्रथम तीन क्रमांकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. गणेश मर्गज यांनी विद्यालयामध्ये सुरु असलेल्या आयबीटी विभागाचे कौतुक केले. डॉ. प्रसाद देवधर म्हणाले, गावातील लोकांनी व विद्यार्थ्यांनी नोकरी मिळविण्यापेक्षा पशुपालन, दुध डेअरी व्यवसायाकडे वळले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. राजकारण्या व्यक्तीनी दूध व्यवसायाला चालना दिल्यास शेतकरी दूध व्यवसायाकडे वळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दत्ता सामंत म्हणाले, दोन वर्षांमध्ये आपण किमान दहा हजार लिटर दूध उत्पादन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. विद्यालयामध्ये सुरु असलेल्या आयबीटी अंतर्गत शेती विभागाला पाणीपुरवठा कमी होतो. त्यासाठी आपण बोअरवेल खोदून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
राजेश सामंत यांनी संस्थेमध्ये व माड्याचीवाडी हायस्कुलमध्ये कोणते उपक्रम राबविले जातात याचा थोडक्यात आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. के. राणे यांनी केले. अहवाल वाचन राजेंद्र घाडीगावकर यांनी केले. आभार श्रीम आजगावकर यांनी मानले.

You cannot copy content of this page