स्त्रीमुक्ती चळवळीला ५० वर्षे झाल्याचे औचित्य:राज्यभरातील स्त्रीवादी महिला वक्त्यांचे मार्गदर्शन..
कुडाळ : स्त्रीमुक्ती चळवळीला पन्नास वर्ष झाली. त्या निमित्ताने येत्या ११ मे रोजी कुडाळमध्ये महालक्ष्मी हॉल येथे सकाळी १० ते ५ या वेळेत मनुस्मृती नको, संविधान हवे या कार्यशाळेच आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी विविध स्त्रीवादी महिला वक्त्या मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती कमलताई परुळेकर, सत्यशोधकचे ऍड सुदिन कांबळे, नितीन वाळके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कमलताई परुळेकर यांनी याबाबत हॉटेल गुलमोहोर येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला सत्यशोधकचे ऍड सुदिन कांबळे, नितीन वाळके यांच्यासह अतुल बंगे, स्वाती पेडणेकर, विशाल जाधव आदी ऊपस्थित होते.
कमलताई परुळेकर म्हणाल्या, आजकाल समाजात वाढत चाललेले असहिष्णू वातावरण,धर्म,वर्ग, लिंग यावरून भेदाभेद ,विशेषतः मुस्लीम विरोध हे सर्व वेळीच थोपवले नाही तर या देशात अराजक माजेल. त्याचे कारण आपण असू. पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.म्हणून याची जाणीव असलेली सर्व मंडळी कुडाळ येथे रविवारी ११ मे रोजी रोजी महालक्ष्मी हॉल येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. स्त्रीमुक्तीआन्दोलनाला 50वर्षे झाली, त्यानिमित्ताने सुवर्ण महोत्सवी वर्षात जिल्हावार मनुस्मृती नको ,संविधान हवे अभियान राबविले जात असून त्याचा एक भाग म्हणून सर्व संघटनांकडून सुमारे 150 कार्यकर्ते एकत्र येतील. मनुस्मृती व संविधान यांचा अभ्यास असलेल्यां स्त्रीवादी नेत्या सुषमा अंधारे, प्रतिमा परदेशी,असुन्धा पारधे, शमा दलवाई,संध्या म्हात्रे या वक्त्या यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्र सेवादल, अंगणवाडी कर्मचारी सभा, शिक्षक भारती, आम्ही भारतीय, समता प्रतिष्ठान, अद्वैत फाउंडेशन, दर्पण प्रबोधिनी, सत्यशोधक जन आंदोलन, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, सत्यशोधक सेक्युलर फ्रंट, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नत्ती मंडल, जिल्हा शालेय स्वयंपाकी संघ , गोजिरी आश्रम इत्यादी संघटनाचा या कार्यशाळेला सहकार्य असणार आहे, असे श्रीमती परुळेकर यांनी सांगितले. तसेच यावेळी सर्वधर्मिय सलोखा समिती स्थापन करण्यात येतील. या कार्यशाळेला स्री-पुरूषानी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन कमल परुळेकर, सुदीन कांबळे, नितीन वाळके, अतुल बंगे, स्वाती पेडणेकर, विशाल जाधव यानी केला आहे.
यावेळी बोलताना ऍड. सुदिन कांबळे आणि नितीन वाळके यांनी देखील देशाच्या आजच्या परिस्थितीत अशा कार्यशाळेची आवश्यकता आणि गरज अधोरेखित केली. नामवंत स्त्रीवादी वक्त्या या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे चांगले विचारमंथन होणार आहे. या कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन या सर्वानी केले आहे.
