सिंधुदुर्गात उद्या युद्धजन्य परिस्थितीची रंगीत तालीम…

दुपारी ४ वाजता, रात्री ८ वाजता होणार प्रात्यक्षिके:नागरिकांनी सहकार्य करावे;जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे आवाहन..

ओरोस ता ६
भारत – पाकिस्तान देशांत युद्ध संभाव्य असल्याचे मानत सिंधुदुर्गात बुधवारी एकाचवेळी युद्धजन्य परिस्थितीचा सामना कसा करावा ? याचे प्रात्यक्षिक दाखविणारी दोन रंगीत तालीमी होणार आहेत. दुपारी ४ वाजता १५ मिनिटांसाठी आणि रात्री ८ वाजता १५ मिनिटांसाठी वीज पुरवठा बंद करून ब्लॅक आऊट केले जाणार आहे. यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठक सभागृहात पत्रकार परिषद घेत मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक कृषीकेश रावले, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापक राजश्री सामंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते.
देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हल्ला झाल्यास आपण सर्व एक आहोत, हे दाखविण्यासाठी बुधवारी रंगीत तालीम घेण्यात येत आहे. यामध्ये हल्ला झाल्यास नागरिकांनी आपली सुरक्षितता कशी घ्यावी ? काय करावे आणि काय करू नये ? याचे प्रात्यक्षिक उद्या होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता भविष्यात असा प्रसंग ओढवल्यास काय करायचे ? याची कृती या रंगीत तालमीत करावी, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी केले आहे.

You cannot copy content of this page