उध्दवसेनेच्या नेत्यांचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना इशारा..
कणकवली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने बांदा ते खारेपाटणपर्यंत महामार्ग भूसंपादन सीमांकन (आरओडब्ल्यू) मध्ये ज्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत ५ मे पर्यंत योग्य तो निर्णय घ्यावा. अन्यथा महामार्ग रोको आंदोलन करण्यात येईल.असा इशारा उध्दवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिला.
तसेच राजकीय दबावापोटी एका विशिष्ट धर्माला अथवा विरोधी पक्षातील व्यक्तींना टार्गेट करून चुकीच्या पद्धतीने अनधिकृत नसलेले त्यांचे बांधकाम हटविण्याची कारवाई अधिकाऱ्यांनी करू नये. तसे झाल्यास शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल,असेही यावेळी अधिकाऱ्यांना सुनावण्यात आले.
माजी आमदार वैभव नाईक, राजन तेली, परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता अतुल शिवणीवर, सहायक कार्यकारी अभियंत्या वृषाली पाटील, सहायक अभियंता बी.जे.कुमावत यांची शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी भेट घेतली.
यावेळी उध्दव सेनेच्या महिला आघाडीप्रमुख मधुरा पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, युवासेनेचे कणकवली तालुका समन्वयक तेजस राणे, अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी मज्जीद बटवाले, ग्रामस्थ अब्दूल नावलेकर, महम्मद नावलेकर, बकर नावलेकर, हुसेन नावलेकर, पिनाज नावलेकर, जासमिन नावलेकर, इम्रान नावलेकर आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात यासह अन्य प्रलंबित प्रश्न व समस्यांवरून उध्दवसेनेच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. महामार्ग संदर्भातील प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांना सिंधुदुर्गात बोलवून त्यांच्यासमवेत आमची बैठक घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महामार्ग प्राधिकरणने अलीकडेच नांदगाव येथे स्टॉलवर कारवाई केली होती. ही कारवाई राजकीय दबावापोटी करण्यात आली होती, असा आरोप नांदगावातील मुस्लिम बांधव व स्टॉलधारकांनी केला. अधिकाऱ्यांच्या या कृतीबद्दल राजन तेली, परशुराम उपरकर, वैभव नाईक,सतीश सावंत,संदेश पारकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. राजकीय दबावापोटी व चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण हटाव मोहिमेची कारवाई करत असाल तर ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.तसेच अतिक्रमण काढणार असाल तर जिल्ह्यातील सर्वच अतिक्रमण काढा. दूजाभाव करून विशिष्ट व्यक्तींवर कारवाई करू नका,असेही यावेळी सांगण्यात आले.
बांदा ते खारेपाटण हद्दीत महामार्गाचे काम पूर्ण झाले असून या हद्दीत प्राधिकरणकडून सर्व्हिस रोडसह अन्य कामे हाती घेण्यात आली आहेत. काही ठिकाणी काम करण्याची आवश्यकता नसतानाही बांधकाम केले जात असून हा जनतेच्या पैशांचा चुराडा आहे, असा आरोप त्यांनी केला. महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणने काय उपाययोजना केल्या यावरून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. महामार्गावर किती ठिकाणी हेल्पलाईन नंबरचे फलक लावले ? रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली का ? हळवल फाटा येथे अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या ? अपघातात किती बळी गेल्यानंतर प्राधिकरण उपाययोजना करणार आहे ? यासह अन्य प्रशांचा भडिमार केला. तळेरे – वैभववाडी रस्त्याचे काम का रखडले आहे, असा सवाल पारकर यांनी करत अतुल शिवणीवार यांना फैलावर घेतले.
राजकीय दबावापोटी एका धर्माला किंवा विरोधकांना टार्गेट करून महामार्गलगतची अनधिकृत नसलेली अतिक्रमणे हटविली जात असतील तर उध्दवसेना गप्प बसणार नाही, असा इशारा सावंत यांनी दिला. प्राधिकरणचे तत्कालीन अधिकारी प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक व त्यांना मारहाण करणारे आमदार नितेश राणे आता पालकमंत्री झाले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा काय करायची ? असा टोला संदेश पारकर यांनी यावेळी लगावला.
