आम. निलेश राणे यांच्याशी पंगा नको !

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना इशारा..

कुडाळ : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी विनाकारण आमचे श्रद्धास्थान असलेले आमदार निलेश राणे, राणे कुटुंबिय आणि शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षावर टिका करणे थांबवावे. अन्यथा राणेंचे खंबीर कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येत वैभव नाईक यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा, शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी दिला आहे. तसेच या खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस कुडाळ येथे कोणाच्या हाॅटेलमध्ये बसायचा?, ते हाॅटेल कोण चालवतय? असा सवालही श्री.कांदे यांनी उपस्थित केला.
कुडाळ येथील महायुती कार्यालय येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत राकेश कांदे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष विनायक राणे, न.पं.गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक अभी गावडे, ऍड.राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, प्रसन्ना गंगावणे आदी उपस्थित होते.
श्री.कांदे म्हणाले, बिडवलकर खून प्रकरणी ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आ.निलेश राणे यांच्यावर विनाकारण टिका केली. त्यांना जनतेने केलेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याने ते विनाकारण राणे कुटुंबियांवर टिका करत आहेत. त्यांनी या खून प्रकरणी केलेला राजकीय शो सफशेल फेल ठरला आहे. त्यांनी संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट याचे फोटो आ.राणेंसोबत व्हायरल केले, मग तोच सिद्धेश शिरसाट वर्षाच्या ३२५ दिवसापैकी ३०० दिवस कुडाळ येथे कोणाच्या हाॅटेलमध्ये बसायचा?, हे हाॅटेल ठाकरे सेनेचाच पदाधिकारी चालवतो मग हेही त्यांनी जाहीर करायला हवे होते. त्या हाॅटेलचे उद्घाटनच वैभव नाईक यांच्या हस्ते झाले आहे, याचे फोटो आमच्याकडे आहेत. सिद्धेश शिरसाट त्यावेळी तेथे बील पेड करायचा कि नाही, याची माहीती हॉटेल मालक असलेल्या त्या पदाधिकाऱ्यांकडून वैभव नाईक यांनी घ्यावी. केवळ सिद्धेश शिरसाट हा आ.राणेंसोबत फोटोत दिसतो म्हणून नाहक आरोप करणे चुकीचे आहे, असे श्री.कांदे म्हणाले.
श्री.कांदे पुढे म्हणाले, बिडवलकर खून प्रकरणात ज्या इम्रान शेखची गाडी घेण्यात आली होती, त्याच इम्रान शेख सोबत अक्रम राठी नावाचा वैभव नाईक यांचाच कार्यकर्ता नेहमी असतो. त्याच अक्रम राठीला वैभव नाईक केक भरवतानाचे त्यांचे फोटो आहेत. तसेच गांजा प्रकरणात ताबीश नाईक नावाच्या त्यांच्याच कार्यकर्त्यावर केस चालू आहे. इम्रान शेख माजी खासदार विनायक राऊत यांच्या सोबत एका कार्यक्रमात उपस्थित असल्याचे फोटो आमच्याकडे आहेत. तसेच त्यांच्याच एका पदाधिकाऱ्यावर सावंतवाडी तहसीलदारांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक प्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. मग अशा लोकांच्या टोळीचे वैभव नाईक तुम्ही आका आहात का? असा सवाल श्री.कांदे यांनी उपस्थित केला.
आ.निलेश राणे यांनी या खून प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. जेव्हा कुडाळ येथे श्रीराम मंदीर रॅली काढण्यात आली होती त्यात असंख्य नागरिक सहभागी झाले होते, तेव्हाच सिद्धेश शिरसाट याची शिंदे सेनेत एन्ट्री झाली. तेव्हा आ.राणे भाजपात होते. त्यामुळे विनाकारण आ.राणेंची वैभव नाईक यांनी बदनामी करू नये. ही कणकवली नव्हे तर कुडाळ आहे, हे लक्षात ठेवावे; असा इशारा श्री.कांदे यांनी देत, आम्ही महायुती म्हणून एकसंघ आहोत. आ.राणे यांनी जनतेच्या हिताचे प्रश्न विधानसभेत मांडत न्याय मिळवून दिला आहे. यापुढेही ते मोठ्या मताधिक्यानेच निवडुन येत जनतेच्या मनातील त्यांचे स्थान कायमच राहणार आहे, असे श्री.कांदे यावेळी म्हणाले.

You cannot copy content of this page