सचिव दत्तप्रसाद वालावलकर: सर्व कार्यकारिणीची निवड झाली बिनविरोध..
ओरोस ता २१
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लवू म्हाडेश्र्वर, सचिव पदी दत्तप्रसाद वालावलकर यांच्यासह सर्व कार्यकारिणी निवड बिनविरोध करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचा कालावधी संपल्याने नवीन कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणूक निरीक्षक विद्याधर केनवडेकर, अमित खोत यांच्या उपस्थितीत सोमवारी जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीच्या नवीन कार्यकारिणीच्या निवडी पार पडल्या. यावेळी उपाध्यक्ष पदासाठी तेजस्वी काळसेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर खजिनदार पदासाठी गिरीश परब, सहसचिव पदासाठी सतीश हरमलकर यांना दुसऱ्यांदा संधी देत या पदांवर कायम ठेवण्यात आले. या सर्व पदांसाठी एक एकच व्यक्ती इच्छुक असल्याने या सर्व निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निरीक्षकांनी जाहीर केले.
सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक इमारतीच्या सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. यावेळी मावळते अध्यक्ष संदीप गावडे, जिल्हा सचिव बाळ खडपकर, राज्य परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, संजय वालावलकर, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, मनोज वारंग, देवयानी वरसकर आदी सभासद उपस्थित होते. बिनविरोध निवडी केल्याने नवनियुक्त पदाधिकारी आणि मुख्यालय पत्रकार यांचे दोन्ही निरीक्षकांनी अभिनंदन केले. यावेळी मावळते अध्यक्ष गावडे यांनी मागील दोन वर्षात चांगले काम केल्याने त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. तसेच दोन्ही निरीक्षकांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी गावडे यांच्या कामकाजाचे कौतुक करतानाच नवीन कार्यकारिणीने यापेक्षा उजवे काम करावे, असे आवाहन सभासदांनी केले. श्री गावडे यांनीही सर्व सभासदांचे सहकार्य लाभल्याने आपण चांगले काम करू शकलो, असे सांगितले.
