वैभव नाईक यांनी जिल्ह्याची व निलेश राणेंची बदनामी थांबवावी…

अन्यथा ‘आका’ कोण हे आम्ही उघड करू:दत्ता सामंत यांचा इशारा..

⚡मालवण ता.१५-:
सिद्धीविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाट हा दोन वर्षापूर्वी ठाकरे गटातच होता. तरीही माजी आमदार वैभव नाईक या प्रकरणातील आका कोण असे विचारत बीड जिल्ह्यासोबत तुलना करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी करत आहेत. वैभव नाईक यांनी जिल्ह्याची आणि आमदार निलेश राणे यांची बदनामी थांबबावी, नाहीतर सिद्धेश शिरसाट याचे वैभव नाईक यांच्यासोबतचे फोटो आम्हीही समोर आणू आणि या प्रकरणातील आका कोण हे आम्हाला उघड करावे लागेल असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

प्रकाश बिडवलकर खून प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण कुंभारमाठ येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाऊ मोर्जे आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी दत्ता सामंत म्हणाले, प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाट याचे आमदार निलेश राणे यांच्या सोबतचे फोटो दाखवून वैभव नाईक हे या प्रकरणातील आका कोण अशा बोंबा मारत आहेत. हे प्रकरण दोन वर्षापूर्वी घडलेले असून त्यावेळी सिद्धेश शिरसाट हा वैभव नाईक यांच्याच ठाकरे गटात होता. त्याचे व्यवसाय नाईक यांच्याच आशीर्वादाने सुरु होते. निलेश राणे व आम्ही सहा महिन्यापूर्वी भाजपामधून शिंदे शिवसेनेत आलो. त्यामुळे नाईक यांच्या बोंबा या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. घटना कधीची आणि त्यावेळी आरोपी कुठे होता हे नाईक यांनी स्पष्ट करावे. झालेले खून प्रकरण वैयक्तिक वादातून घडलेले असल्याने यामध्ये नाहक कोणाचे नाव घेऊन बदनामी करण्याचे षडयंत्र नाईक यांचे आहे. काहीही घडले की राणेंवर ढकलायचे बदनाम करायचे हेच काम नाईक यांचे आहे. निवडणुकीत पडलेल्या व जनतेने नाकारलेल्या माजी आमदाराने यावर बोलू नये. उगाच बोंबा मारून शांतप्रिय सिंधुदुर्ग जिल्ह्याची तुलना बीड जिल्ह्याशी करू नये, असा इशारा दत्ता सामंत यांनी यावेळी दिला.

आमदार झाल्यापासून निलेश राणे चांगले काम करत आहेत. त्यांच्या कामाचे जनतेतून कौतुक होत आहे. या प्रकरणात पोलीस तपास करत असून ते योग्य तो न्याय देतील, दोषींना पकडतील. पोलीसांच्या कामात आमचा हस्तक्षेप नाही, तसेच या प्रकरणाशी आमचा संबंध नाही. असे असताना नाईक यांनी निलेश राणे यांची बदनामी करणे थांबवावे. अन्यथा सिद्धेश शिरसाट याचे वैभव नाईक यांच्या सोबतचे फोटो आमच्याकडेही असून पुढील पत्रकार परिषदेत ते प्रसिद्ध करू, या प्रकारणातील आका कोण हे आम्ही उघड करू, असा इशाराही दत्ता सामंत यांनी दिला.

You cannot copy content of this page