माजी आमदार परशुराम उपरकर यांची पालकमंत्री ना. नितेश राणेंवर टीका..
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याची घोषणा केल्यानंतर गोवा राज्यातील पोलीस येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ड्रग्स पकडतात, ही खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांची व पोलिसांची नामुष्की आहे, अशी टीका माजी आ. परशुराम उपरकर यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्यावर केली आहे. कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उपरकर पुढे म्हणाले, पालकमंत्र्यांनी अनेक वेळा नामुष्की स्वीकारलेली आहे. ज्यावेळी अफजलखानाची कबर कधी तुटली जाईल ‘सकाळच्या वेळात’ अशी स्टेटमेंट करणाऱ्या पालकमंत्र्यांना शेवटी आरएसएस कडून बोलणं आले तेव्हा चिडीचूप झाले. हिंदुत्वाच्या बाबतीत बोलताना छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम कधीच नव्हते हे सांगणाऱ्या पालकमंत्र्यांना त्यांच्याच पक्षाचे असलेले खासदार आणि शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे बोलले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माचे लोकांना एकत्र घेऊन हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले आहे. त्यावेळी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना गप्पच राहावं लागलं. प्रत्येक ठिकाणी हिंदुत्वाचा गब्बर म्हणणारे हिंदूंचा सण गुढीपाडवा त्यावेळीआनंदाचा शिधा वाटण्याचा प्रयत्न का केला नाही ? असा सवालही माजी आ. परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे. आता नव्याने दिशा सालीयान च्या प्रकरणाकडे लक्ष केला आहे! कुठून आपण मीडियाच्या प्रकाश झोतात राहू, यासाठी सर्व प्रयत्न चाललेले दिसत आहेत. जिल्ह्यातील मच्छीमारांचे प्रश्न, स्थानिक पारंपरिक मच्छिमार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. परजिल्ह्यातल्या एलईडी बोटी पकडल्या मग सिंधुदुर्ग – रत्नागिरी मधील एलईडी ना का हात लावत नाही ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला आहे.
मटका बंद करण्याची घोषणा केली गेली, मात्र आठ दिवस झाल्यानंतर मटका पुन्हा जोमाने सुरू झालेला आहे. गोवा बनावटीची दारू दिवसाढवळ्या वाहतूक होत आहे. एक्साईज पथक अवैध दारू पकडत आहेत. सातत्याने हे वृत्तपत्रांमध्ये येत आहे. याचाच अर्थ अवैध धंद्यांवर पालकमंत्री, पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची अयशस्वीतेकडे वाटचाल सुरू झालेली आहे.
