⚡मालवण ता.२९-:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी गेले १५ वर्षे अविरित कार्य करणारे व शिवरायांचे विचार तरुण पिढी पर्यंत पोहचवावे म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवणारे अजिंक्य क्रीडा मंडळ -गणेशनगर परेरावाडी घाटकोपर मुंबई यांच्या वतीने शिवगर्जना हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि शिवगीतांचा कार्यक्रम काशिनाथ पांडुरंग शिर्के मैदान येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाची धुरा प्रख्यात शिवशाहीर प्रवीण जाधव यांनी सांभाळली, तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रसिद्ध कलावंत गणेश टिकम यांनी साकारली. या कार्यक्रमास २६/११ च्या हल्ल्यातील मुख्य गुन्हेगार अजमल कसाब याला जिवंत पकडणाऱ्या पोलिसांच्या ताफ्यातील साहसी व्यक्तिमत्व मालवण पोईपचे सुपुत्र श्री. मंगेश नाईक व स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. हा सोहळा मोठ्या दिमाखात आणि आनंदीमय वातावरणात पार पाडला.
