ऑनलाईन बैठकीत एकत्रित लढा उभारण्याचा निर्णय;मुख्यमंत्र्यांचेही लक्ष वेधणार
*💫मालवण दि.२४-:* राज्यातील नाभिक समाजाच्या विविध संघटना असून या सर्व संघटना एकाच छताखाली येऊन समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी नुकतीच या विविध संघटनांची संयुक्त ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या समस्यांबाबत एकत्रित लढा उभारण्याचा निर्णय घेतला. येत्या ३ ते ४ दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या समस्यांबाबत निवेदन देण्याचे ठरले. समाजाबद्दल मुख्यमंत्र्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, तर नाभिक समाजाच्या सर्व संघटना एकत्रितपणे व योग्य दिशेने लढा उभारून समाजाला न्याय मिळवून देण्यास तयार आहेत, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नाभिक समाजातील कोणत्याही एका समाज नेत्याच्या नेतृत्वाखाली एकत्र न येता सर्व नेते मंडळी समाजाने केलेल्या आवाहनामुळे या ऑनलाईन बैठकीद्वारे एकत्र आली. बैठकीला प्रामुख्याने सर्व संघटनांचे अध्यक्ष व त्यांच्या सोबत एक प्रतिनिधी उपस्थित होता. येत्या काळात एकटी संघटना कोणतेही आंदोलन करणार नाही, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला. सर्व समाजातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. सर्व समाज बांधव न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, येणारा काळ नाभिक समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असा काळ राहील आणि यात जर कोणी विघटन करण्याचे काम करून समाजाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला तर समाज त्या समाज कंटकाला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. कल्याणराव दळे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, सर्व नेत्यांची साथ त्यांना लाभली होती. यामध्ये भगवानराव बिडवे (अण्णा), अरुण जाधव, दिनेश महाले, नंदू खरे, उदय टक्के, सोमनाथ काशीद, धनराज वलुकार, अमोल तळखंडे, संतोष कुरमेलवार, महावीर गाडेकर, माधव भाले, धनराज सोनवणे, संभाजी रायकर, भारत सोनवणे, नरेश गायकर, पांडुरंग डांगे, सुदाम शिंदे, संजय गायकवाड, राजकुमार गवळी आदी उपस्थित होते, असेही नाभिक समाजातर्फे सांगण्यात आले. राज्यातील नाभिक समाज या सर्व पदाधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या अपेक्षेत असून सर्व नेते मंडळी मिळून जो निर्णय घेतील त्यात आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. समाजातर्फे सर्वजण एकत्रित आहोत, असेही अन्य पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
