गुढीपाडवा शोभायात्रेत गोव्याचे चित्ररथ:काका कुडाळकर यांची पत्रकार परिषदेत माहिती..
कुडाळ : कोकणातील रोंबाट आणि राधा नृत्य या लोककलेला स्पर्धेच्या माध्यमातून ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतुन २९ आणि ३० मार्चला कुडाळ येथे भव्य रोंबाट, राधानृत्य आणि चित्ररथ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान गुढी पाडव्याला काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत गोव्यातले भव्य देखावे चित्ररथाच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. कुडाळ तहसील नजिकच्या मैदानावर महायुतीला साजेचा असा शिमगोत्सव सोहळा होणार आहे.
कुडाळ येथील महायुतीच्या कार्यालयात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री.कुडाळकर बोलत होते. यावेळी शिवसेना नेते संजय पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर आदि उपस्थित होते.
यावेळी श्री.कुडाळकर म्हणाले की, आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथील शिमगोत्सव कार्यक्रम भव्य दिव्य असा होणार आहे.शनिवारी सायंकाळी ७ वाजता या महोत्सव कार्यक्रमाचा आ.निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ होणार आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक ३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी कुडाळ विधानसभा मतदारसंघात प्रथमच हिंदू नववर्षाला कुडाळ मधील जनतेला आ.निलेश राणे शुभेच्छा देतील. विशेष म्हणजे या दिवशी कुडाळ शहरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत गोव्यातील खास ४ आकर्षक देखावे दाखल होणार आहेत. शोभा यात्रेची सुरुवात कुडाळ कॉलेज चौक-पोलीस स्टेशन-जिजामाता चौक-गांधी चौक ते गुलमोहर हॉटेलपर्यंत होणार आहे. कुडाळ जिजामाता चौक येथे या रॅलीमध्ये आमदार निलेश राणे स्वतः सहभागी होणार आहेत. गुढीपाडव्या दिवशी एक नवीन संदेश देण्याचं काम आमदार निलेश राणे करणार आहे. या शिमगोत्सवाच्या सादरीकरणातून लोकांना अधिकाधिक आनंद देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. या महोत्सवात अधिकाधिक राधा नृत्य सादर केली जातील. अशी माहिती श्री.कुडाळकर यांनी दिली.
