अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी दोघे ताब्यात…

⚡सावंतवाडी ता.२५-: अवैधरित्या सुमारे सव्वा दोन लाख किंमतीच्या गुटखाची वाहतूक करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करीत दोघांना अल्टो गाडीसह ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ओटवणे- चराठा मार्गावर करण्यात आली. याप्रकरणी बाबाजी विजय नाईक (42 रा- खासकीलवाडा सावंतवाडी) व उमेश रघुनाथ सावंत (50, वायंगणी ता.मालवण )या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने दिली. अल्टो गाडीतून अवैधरित्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची ओटवणे येथून वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाचे निरीक्षक समीर भोसले, सहाय्यक निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, हवालदार प्रकाश कदम व जयेश करमळकर यांनी मंगळवारी सायंकाळी चराठा येथे सापळा रचला होता. ओटवणेच्या दिशेने येणारी अल्टो कार तपासणीसाठी थांबवण्यात आली. कारची तपासणी केली असता कार मध्ये शासनाने प्रतिबंध केलेला 2 लाख 38 हजार रुपये किमतीचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ असा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी (बाबाजी नाईक, सावंतवाडी) व (उमेश सावंत, मालवण )या दोघांना ताब्यात घेतले तसेच वाहतुकीस वापरलेली एक लाख रुपये किंमतीची अल्टो कार जप्त करण्यात आली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

You cannot copy content of this page