लवकरच वसई पनवेल लोकल धावणार…!

वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश : श्री.यशवंत जडयार..

⚡सावंतवाडी ता.२५-: डहाणू पनवेल मार्गावर बोईसर,वसई ,वाडा व भिवंडी परिसरात मोठया प्रमाणात इंडस्ट्रीज असून ह्या मार्गावर धावणाऱ्या मेमूच्या फेऱ्याही मर्यादित असल्याने वसई भिवंडी पनवेल मार्गावर मुंबई लोकल सुरू कराव्यात अशी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मागील अनेक वर्षापासून रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे सातत्याने मागणी होत होती.याला मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मंजूरी दिल्याने वसई विरारकरांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

  तसेच वसई विरार परिसरात मोठया प्रमाणात कोकणाच्या सिंधुदुर्ग,रत्नागिरी व रायगड जिल्हातील लोकांची लोकवस्ती असल्याने त्यांना गावावरून येण्यासाठी पनवेल व्हाया दादर करून वसई विरार येथे येण्यासाठी ४ तासांचा वेळ लागतो यासाठी वसई पनवेल मार्गावर लोकल सुरू झाल्यास चाकरमन्यांचे २ तास वाचतील असे अध्यक्ष श्री.अनिल मोरे यांनी सांगितले.

 आज मुंबईमध्ये फक्त ऑफीसेस असून त्यांची सर्व मोठी वेअरहाऊसेस बोईसर,वसई,वाडा व भिवंडी परिसरात असल्याने येथे कामगारांची मोठी संस्था आहे मात्र ट्रान्सपोर्ट हब नसल्याने कामगारांची प्रवासासाठी मोठी गैरसोय निर्माण होत होती. ह्या मार्गावर मर्यादित मेमूची संख्या असल्याने कित्येकदा कामगार भिवंडी रेल्वे स्टेशनला येऊन अडकतात.यासाठी प्रवासी संघटनेच्या वतीने वसई पनवेल मार्गावर लोकल सुरू करावी अशी सातत्याने मागणी करीत होतो असे सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सांगितले.

 वसई पनवेल मार्गावर लोकल सुरू झाल्यास डहाणू ते पनवेल मार्गावरील रहिवाश्यांना याचा लाभ होईल व त्यांच्या प्रवासाला गती मिळेल. ह्या मार्गावर मोठया प्रमाणात रेल्वे ट्रक व ब्रीजचे कामही जलद गतीने सुरू आहे,सिग्नल यंत्रणेमध्ये बदल घडवल्यास लोकल चालवणे सोपे जाईल. ह्या लोकल मार्गामुळे मुंबईच्या बाहेरील पालघर,ठाणे व रायगड जिल्ह्यांना विकासाची गती मिळेल.
You cannot copy content of this page