कणकवली – संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत तालुक्यातील ९७ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. कणकवली येथील तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सदरची बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकूण ९७ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती संजय गांधी विभागाकडून देण्यात आली आहे.
तहसीलदार कार्यालयात झालेल्या या बैठकीला तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, अव्वल कारकून डी. एम. पाटील, हेमलता तोरस्कर, अक्षता बागवे आदी उपस्थित होते.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या ४८, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेच्या गट अ मधील ८, श्रावणबाळ सेवा राष्ट्रीय निवृत्ती योजना गट ब मधील ३३, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेच्या ८ अशा एकूण ९७ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
