Headlines

अर्जुन रावराणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात केली पक्षांसाठी पाणवठ्याची व्यवस्था…

⚡वैभववाडी ता.२२-: वाढत्या शहरीकरणाबरोबर चिमण्यांची संख्या कमी झाली. मात्र, त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि सोबत अन्य पक्ष्यांचाही उन्हाळा सुसह्य करण्यासाठी अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या वतीने जागतिक चिमणी दिनानिमित्त टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित शालेय परिसरात पक्षांसाठी पाणवठा हा उपक्रम राबवण्यात आला. शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. चिमणीसारखे दिसणारे अनेक काळ्या, करड्या रंगाचे पक्षी सध्या विद्यालयाच्या प्रांगणात आढळतात. पण चिमणी नजरेस पडणे दुर्मिळ झाले आहे. वाढता उकाडा लक्षात घेता माणसाप्रमाणेच सर्वच पक्ष्यांनाही पाण्याची नितांत गरज असते. त्यामुळे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या सांस्कृतिक विभाग व हरित सेना विभागाच्या वतीने प्रशालेच्या आवारातील झाडांवर पक्षांसाठी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित पाण्याची भांडी ठेवण्यात आली आहेत. नित्य नियमाने त्यातील पाणी बदलता येईल अशा रितीने ती शालेय परिसरात व परिसरातील झाडांवर ठेवण्यात आली आहेत.
२० मार्च जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग व हरित सेना विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेच्या परी नेवरेकर, हर्षदा तांबे, अन्मय शिंदे, गणेश चव्हाण यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यांना प्रशालेचे कलाशिक्षक मंदार चोरगे, सांस्कृतिक विभाग व हरित सेना विभाग प्रमुख विजय मरळकर, पंडीत पवार यांनी मार्गदर्शन केले तर शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत साखरपेकर यांनी विद्यार्थ्यांना सदर उपक्रमाबाबत सहकार्य केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व उपक्रमात सहभागी वर्गाचे संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page