Headlines

मच्छीमारांना मदतीसाठी वार्षिक ७५ हजाराचे पॅकेज द्यावे – सुरेश बापर्डेकर…

⚡मालवण ता.१८-:
शासनाने कोकण किनारपट्टीवरील प्रत्येक छोटे मच्छीमार आणि रापण संघातील सभासद यांना ७५ हजार रुपयांचे वार्षिक पॅकेज कायमस्वरुपी जाहीर करावे, अशा मागणीचे निवेदन भाजप कोकण विकास आघाडी, मुंबईचे सचिव आणि तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी मत्स्यव्यवसायमंत्री व सिंधुदुर्ग पालकमंत्री नीतेश राणे, महाराष्ट्र राज्य आयुक्त, मत्स्य व्यवसाय-मुंबई, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग विभाग-मालवण यांना दिले आहे.

अरबी समुद्राच्या कोकण किनाऱ्यावर मत्स्यदुष्काळ जाहीर करावा. छोट्या मच्छीमारांसह रापण संघातील प्रत्येक सभासदाला ७५ हजार रुपये प्रतिवर्षी द्यावेत, याकरिता बजेट अधिवेशनात आणि मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी घेऊन मच्छीमारांना न्याय द्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०५ रापण संघ असून त्यावर ४४०५ सभासद अवलंबून आहेत. सरकार ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करून प्रतिवर्षी ठराविक रक्कम देते, तशी प्रत्येक छोटा मच्छीमार आणि रापण संघातील प्रत्येक सभासदाला वार्षिक ७५ हजार रुपये देण्यात यावेत. हे प्रतीवर्षी देण्याचा कायमस्वरुपी शासन निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी सुरेश बापर्डेकर यांनी केली आहे.

एलईडी लाईटने मासेमारी करणारे बाहेरच्या राज्यातील मच्छीमार येथे येऊन मासे पकडतात. त्यावर प्रत्येक अधिवेशनात प्रश्न उपस्थित होतो. परंतु हवा तसा कठोर कायदा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना हवे तसे संरक्षण नसल्याने तेही विशेष लक्ष देत नाहीत. मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून बाहेरून आलेल्या बोटींवर कडक नियम करून संबंधित अधिकाऱ्यांना अधिकार बहाल करून बंदोबस्त केला जात आहे. याबद्दल राणेंचे आभार मानायला हवेत. यापूर्वी छोटे पॅकेज केंद्र आणि राज्य सरकारने दिले. ते समाधानकारक नव्हते. याचकरिता सरकारने ७५ हजार रुपयांचे वार्षिक पॅकेज जाहीर करून तसा शासन निर्णय काढावा, अशी मागणी बापर्डेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page