⚡सिंधुदुर्गनगरी दि.१७-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रविंद्र खेबुडकर यांनी आज पदभार स्वीकारला. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासन अनेक महत्वाकांक्षी योजना राबवित असते. या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पायाभूत सोयी सुविधांचे बळकटीकरण करण्याला मी प्राधान्य देणार आहे असेही खेबुडकर यांनी सांगितले. श्री खेबुडकर हे यापूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेचे उप सभापती यांच्याकडे खाजगी सचिव म्हणून कार्यरत होते.
जिल्हा परिषदेचे नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची हाफकीन बायो – फॉर्मा कॉप्रोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रविंद्र खेबुडकर यांची शासनाने नियुक्ती केली आहे. आज श्री खेबुडकर यांनी हजर होत कार्यभार स्वीकारला आहे.
रविंद्र खेबुडकर हे यापूर्वी १९९७ मध्ये सिंधुदुर्ग येथे परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी सावंतवाडी प्रांताधिकारी म्हणून देखील वैशिष्ट्यपूर्ण काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा चांगला परिचित आहे. त्यानंतर त्यांनी सन २००० साली जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून तर सन २००६ ते २०१२ कोल्हापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण (midc) येथे प्रादेशिक अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांनतर सन २०१६ ते २०१९ दरम्यान सांगली- मिरज- कुपवाड महानगर पालिकेच्या आयुक्त पदाची यशस्वी धुरा सांभाळली आहे. सन २०१९ ते २०२५ दरम्यान विधान परिषदेचे उपसभापती यांचे सचिव म्हणून देखील ते कार्यरत होते.
