मालवण (प्रतिनिधी) कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांना नगरसेवकाकडून शिवीगाळ करून तेथील खुर्ची उचलून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा मालवण नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आज शुक्रवारी जाहीर निषेध केला. या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले. कुडाळ केळबाईवाडी येथील शिवाजी पार्कच्या सर्व्हे क्रमाकांच्या मोजणीच्या विषयावरून झालेल्या वादात कुडाळचे शिवसेना नगरसेवक गणेश भोगटे यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांना शिवीगाळ करून तेथील खुर्ची उचलून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना काल घडली होती. याबाबत मुख्याधिकारी गाढवे यांनी पोलिसात तक्रारही दिली आहे. या घटनेचा जिल्ह्यातील प्रशासनाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मालवण नागरपरिषदेच्या प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनीही काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध व्यक्त केला. यावेळी अधिकारी श्री.गावित, महेश परब, श्री. रावले, कर्मचारी श्री.म्हापणकर, सौ. रसिका कुलकर्णी, हेमंत कोचरेकर आदी व इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
कुडाळ मुख्याधिका-यांना शिवीगाळीचा मालवण नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून निषेध..
