⚡सिंधुदुर्ग दि.१३-: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्यासह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माजी आमदार आणि शिक्षक परिषदेची बुलंद तोफ ना.गो.गाणार सर,माजी आमदार भगवानराव साळुंखे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या झंझावती दौऱ्यावर 16 मार्चपासून येत आहेत.
यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे शिक्षक परिषदेचे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे,मुंबई जिल्ह्याचे पदाधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत.महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, कार्याध्यक्ष माजी आमदार ना.गो. गाणार सर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून 16 मार्च 2025 रविवारी सकाळी ठीक अकरा वाजता न्यू इंग्लिश स्कूल ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथे प्रभारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या संदर्भात या सर्व कर्मचाऱ्यांबरोबर सहविचार सभेचे आयोजन केलेले आहे.सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रभारी मुख्याध्यापक आणि त्यांच्या समस्या शाळा तिथे मुख्याध्यापक असणेआवश्यक आहे. शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणावर इथे विचार विनिमय होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीमती कविता शिंपी, अधिक्षक सौ.शलाका तांबे यांच्यासह शिक्षण विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात 17 मार्चला शिक्षक परिषद आंदोलन छेडणार असून यावेळी “बिनकामाच्या” माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना परिषदेच्या वतीने घेराव घालून जाब विचारण्यात येणार आहे.याशिवाय 16 मार्चला रविवारी महाराष्ट्र राज्यातील प्रभारी मुख्याध्यापकावर शासनाकडून होत असलेल्या अन्यायविरोधात वेणूनाथ कडू यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक परिषद जोरदार आंदोलन छेडणार असून सत्ताधारी पक्षाचे लक्ष वेधणार आहेत. तर माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी आणि अधिक्षक सौ.शलाका तांबे हटाव मोहीम परिषदेच्या वतीने राबवली जाणार आहे.
महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू हे दोन-तीन महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिक्षक परिषदेच्या प्रलंबित कामाची यादी दिली होती.तसेच जी कामे प्रलंबित आहेत, ती तात्काळ पूर्ण करण्याचे आदेशही दिले होते.जर ही कामे झाले नाहीत तर आपण जेव्हा सिंधुदुर्गात येणार तेव्हा त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंदे यांनी कुठच्याही प्रकारची कामे अद्यापपर्यंत केलेली नसून त्यांनी शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांवर अन्यायच करण्याचे काम चालू ठेवले आहे.
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी 22 जानेवारी 2025 रोजी रत्नागिरी येथील रेस्ट हाऊसवर शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक तक्रारीचे पाढे वाचले होते. तसेच जी प्रलंबित कामे आहेत, ती तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.मात्र यातील कोणतीही कामे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी अद्यापही केलेली नाहीत.तसेच माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पिळणकर यांची मान्यता सहा सात महिने देखिल अद्यापही प्रलंबित ठेवण्यात आली आहे. चिरीमीरीची मागणी माध्यमिक शिक्षण विभागातील काही कर्मचारी करत असल्याचा शिक्षक परिषदेने आरोप केला होता.याबैठकीत हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणी शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी तत्काळ संजय पिळणकर यांची मुख्याध्यापक पदाची मान्यता देण्याचे आदेश दिले होते.पण हे काम अद्याप झालेले नाही आहे.संजय पिळणकर यांच्याकडे आर्थिक मागणी शिक्षण विभागाकडे केली जात असल्याचा थेट आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केला होता.यावेळी शिक्षक परिषदेने रत्नागिरीतील बैठकीत माध्यमिक शिक्षण विभागातील गैरकारभाराबाबत जोरदार आवाज उठविला होता.मान्यता देताना पीटीआरचा मुद्दा उपस्थित करून पिळणकर यांची मान्यता रोखून माध्यमिक शिक्षण विभाग शिक्षकांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप करत अनेक कामांचा पाढा शिक्षक परिषदेने वाचला होता. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेनी याबैठकीत सुचवलेल्या कोणत्याही सूचनेचे पालन माध्यमिक शिक्षण विभाग कडून अद्याप झालेले नाही आहे.
याशिवाय 3 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीपीडीसीच्या बैठकीत माध्यमिक शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांना शिक्षक परिषदेने निवेदन दिले होते.या निवेदनाची चर्चा आमदार निरंजन डावखरे यांनी सभागृहात करत ही तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली होती.आमदार निरंजन डावखरे यांनी ही सुचवलेली कामे तसेच अपूर्ण फाईल पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी आणि अधिक्षक सौ.शलाका तांबे यांनी ही कामे पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने कुठचेही ठोस पाऊल उचलले नाही. शिक्षक आमदार कोकणामध्ये येतात,सविचार सभा घेतात आणि काही प्रलंबित कामे करण्यासंदर्भात सूचना देऊन जातात.पण ही कामे न करता माध्यमिक शिक्षण विभागातील हे अधिकारी जर अशा मनमानी पद्धतीने वागत असतील तर असे अधिकारी या तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात नकोत.त्यांना या “सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तात्काळ हटवा आणि सिंधुदुर्ग जिल्हा वाचवा”,अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आता घेतली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण विभागात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार माजला असून फायली क्लिअर करण्यासाठी हजारो आणि लाखो रुपयांची प्रत्यक्ष प्रत्यक्षरीत्या डिमांड केली जाते.आणि ही पूर्तता न झाल्यास संबंधित फाईल मध्ये त्रुटी काढून संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देण्याची भूमिका हे अधिकारी घेत आहेत.यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू शिक्षक,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र त्यांच्या या भूमीकडे शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी यांच्यासह त्यांचे अधिकारी कामच करत नसल्याचे समोर आले आहे.त्यांच्या काम न करण्याच्या या पद्धतीबाबत आणी भूमिकेबद्दल आक्रमक भूमीका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने घेतली आहे.
टोपीवाला हायस्कूल मालवणचे शिक्षक देविदास वेरलकर यांचा निवड श्रेणी प्रस्ताव रखडला आहे.देवीदास वेरलकर सर यांची निवडीश्रेणीची फाईल क्लिअर करण्यासाठी जाणून बुजून वेठीस धरण्याचा प्रकार माध्यमिक शिक्षणाधिकारी करत आहेत. हे शिक्षक परिषदेने वेळोवेळी त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.पण कोणताच ठोस निर्णय घेण्यात आला नाही.त्यामुळे आक्रमक झालेल्या शिक्षक परिषदेने शिक्षणाधिकाऱ्यांना आता थेट जाब विचारण्याचा इशारा दिला आहे.तर दुसरीकडे चुकीच्या पद्धतीने समायोजन प्रक्रिया राबवून माणगाव स्कूलचे मागासवर्गीय प्रवर्गातील इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कुडाळ तालुकाध्यक्ष सुरेश उर्फ सचिन एकनाथ कुडाळकर यांना आकाशापोटी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अतिरिक्त ठरवले आहे.वास्तविक मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या समायोजना संदर्भात कोर्ट केस चालू असताना अशा न्यायप्रविष्ठ प्रकरणाबाबत जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही. तोपर्यंत अतिरिक्त करू नये हे अशी भूमिका वेणूनाथ कडू यांनी मांडून देखील सुद्धा कविता शिंपी यांनी आपल्या हट्टापोटी सुरेश कुडाळकर यांचे समायोजन करण्याचा घाट घातला. त्यांची कृती बेकायदेशीर आहे. यासंदर्भात सुद्धा शिक्षक परिषदेच्या वतीने जाब विचारला जाणार आहे. यासह शिक्षक परिषदेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या अनेक फाईल माध्यमिक शिक्षणा विभागाकडे पडून असून त्यावर कोणताही निर्णय घेतला जात नाही. या सर्व बाबीवर आक्रमक भूमिका घेत वेणूनाथ कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आंदोलन छेडणार आहे.तसेच परिषदेच्या वतीने 16 मार्चला खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे यांची भेट घेऊन माध्यमिक शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध लक्ष वेधले जाणार आहेत.
शिक्षकांच्या हक्कावर गदा येत असेल तर त्याचा विरोध शिक्षक परिषदेच्या वतीने नक्कीच होणार आहे. जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांचे प्रलंबित प्रश्न, निवड आणी वरिष्ठ वेतनश्रेणी,मेडिकल बिले, फरकाची बिले यासंदर्भात ज्या शिक्षकांच्या समस्या असतील त्यांनी लेखी स्वरुपात जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कार्यवाह शिक्षक परिषद यांच्याकडे द्याव्यात. यामुळे हे प्रश्न सोमवार दिनांक 17 मार्च 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या समवेत बैठकीत शिक्षक परिषदेच्या वतीने मांडण्यात येणार आहे.तसेच राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू सर, कार्याध्यक्ष माजी आमदार ना.गो. गाणार सर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी यांना घेराव घालण्यात येणार आहे.तरी जास्तीत जास्त शिक्षक व शिक्षकेतर कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपले प्रश्न मांडावेत. तसेच शिक्षक शिक्षकेत्तरांच्या समायोजनाचा जो विषय आहे तो विषय घाई गडबडीत निपटून काढणे,शिक्षक संघटनांना विश्वासात न घेणे, तसेच न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असताना शिक्षकांचं समायोजन करणे अशा विविध विषयांवर आंदोलन छेडण्यत येणार आहे.
तरी वेणूनाथ कडू यांच्या ह्या दौऱ्यात आणि आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, सचिव नंदन घोगळे आणि कोकण विभाग कार्याध्यक्ष सलीम तकिलदार यांनी केले आहे.
