⚡देवगड ता.०८-: देवगड तालुक्यात रस्त्यावर मोकाट जनावरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यामुळे अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले, काही गंभीर जखमी झाले, तर काहींना अपंगत्व आले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा अपघातांचे प्रमाण जास्त आहे.
या समस्येवर उपाययोजना म्हणून ‘मराठा समाज देवगड’ संस्थेच्या वतीने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. दिनांक ८ मार्च २०२५ पासून संस्थेच्या खर्चाने रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या गळ्यात रंग परावर्तक (Reflective) पट्टे बांधण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. वाहनांच्या दिव्यांच्या प्रकाशात हे पट्टे चमकणार असल्याने अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य आवश्यक असून, जर गुरेपालकांकडून यासंदर्भात हरकत किंवा तक्रार आल्यास, त्यांना योग्य ती समज द्यावी, अशी विनंती मराठा समाज देवगड संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीप साटम आणि सचिव श्री. केदार सावंत यांनी नागरिकांना या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हा सामाजिक उपक्रम मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरणार आहे.
