तारामुंबरी येथील मृत मच्छिमाराच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत देणार…

मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून होईल तात्काळ मदत:भाजपा मच्छिमार सेलची कुटुंबियांना ग्वाही..

⚡कुडाळ ता.०४-: राज्याचे बंदर आणि मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मृत मच्छीमार यांच्या कुटुंबीयांना तात्काळ शासकीय मदत मिळवून देणार असल्याचे आश्वासन भाजपा मच्छीमार सेलने त्या कुटुंबीयांना दिले आहे. भाजप सिंधुदुर्गचे मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक.रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हि माहिती दिली.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी देवगड तारामुंबरी येथे मासेमारी करताना संतोष सारंग या मच्छीमाराचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून काल दिनांक ०३ मार्च रोजी मृत मच्छीमार यांच्या कुटुंबीय यांची भाजप मच्छीमार सेल आणि देवगड भाजपा पदाधिकारी यांनी तातडीने भेट घेतली. वस्तुस्थिती जाणून घेतल्यावर पोलिस,आरोग्य आणि मत्स्यविभाग यांच्याशी संपर्क साधला व संबंधित विषयात तात्काळ कागदपत्रे पूर्तता करण्याच्या सूचना केल्या. यावेळी मत्स्य विभाग कार्यालय यांच्या वतीने सागर सुरक्षा रक्षक श्री.खडपे उपस्थित होते. यावेळी मत्स्यविभाग अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेत केंद्र व राज्य शासनाच्या आपत्ती निवारण योजनेतून मृत मच्छीमार यांच्या कुटुंबीय यांना रुपये सहा लाख पर्यंत रक्कम मिळवून देण्या संदर्भात माहिती घेतली गेली.
राज्याचे मत्स्योद्योग मंत्री .नितेश राणे यांच्या माध्यमातून सदरची प्रक्रिया वेगवान करून लवकरात लवकर हि शासकीय मदत मिळवून देण्याबाबत सारंग कुटुंबीय यांना आश्वासीत करण्यात आले. यावेळी भाजपाचे रविकिरण तोरसकर, बाळ खडपे, ज्ञानेश्वर खवळे, बापू जुवाटकर, सुहास पराडकर, छोटू पटेल, मच्छीमार सहकारी संस्था प्रतिनिधी लक्ष्मण तारी, गाबीत समाज बांधव व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते

You cannot copy content of this page