ओसरगाव येथे जळालेल्या स्थितीत सापडलेला मृतदेह सावंतवाडी येथील महिलेचा…

आरोपीला देखील पोलिसांनी घेतले ताब्यात:आरोपीसह अन्य काहींचा घटनेत सहभाग असण्याचीही शक्यता..?

⚡सिंधुदुर्ग दि.२८-: ओसरगाव येथील अर्धवट जळालेल्या स्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे, वरचीवाडी येथील चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या सौ. सुचिता सुभाष सोपटे (वय ५९) हिचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच तिला मारून व अर्धवट जाळून टाकणाऱ्या संशयीत आरोपी वितोलीन फर्नांडिस ( वय ४२, रा. वेंगुर्ले,) याच्या मुसक्या आवळण्यात देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग च्या पथकाला यश आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून आज आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मृतदेह मिळाल्यापासून अवघ्या चौवीस तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुढील तपास सिंधुदुर्ग पोलीस करत आहेत.

आरोपीच्या साथीला अन्य कोणी व्यक्ती असण्याचीही शक्यता ?

पोलिसांना घटनेच्या पार्श्वभूमीवर जसे घटनेचे धागेदोरे मिळत गेले तसे जळीत महिलेची ओळख देखील पटली. त्यानंतर अगदी काही तासांतच आरोपी देखील सापडला आहे. मात्र, या घटनेची पार्श्वभूमी पाहिली तर असा प्रकार कोणी एकटी व्यक्ती करू शकेल हे अशक्य आहे. त्यामुळे आरोपी सोबत अजून काही व्यक्ती असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण त्या महिलेला पहिले मारण्यात आले त्यानंतर तिला ओसरगाव येथे आणून जाळण्यात आले. हे एकट्या व्यक्तीच्या माध्यमातून होणे अशक्य आहे. त्यामुळे निश्चितच या घटनेत अन्य व्यक्तींचा सहभाग असावा अशी चर्चा देखील जिल्ह्यात सुरू आहे.

मृत महिला आणि आरोपीच्या मोबाईल सिडीआर रिपोर्ट नंतर काही गोष्टींचा होईल उलगडा

जळालेली महिला ही घटनेच्या आदल्या दिवशी पासून बेपत्ता होती. त्यामुळे निश्चितच ही घटना घडण्यासाठी आरोपी आणि त्या महिलेची गाठ भेट कशी झाली ? यामागे अन्य कोणी आहे का ? तसेच अन्य कोण्या व्यक्तींचा सहभाग असेल तर ते केवळ जळीत मृत महिला आणि आरोपी या दोघांच्या मोबाईल सीडियर रिपोर्टनुसार सिद्ध होऊ शकते. या दोघांना एका पांढऱ्या कारसह कोल्हापूर येथे एका व्यक्तीने पाहिले होते त्यामुळे ही घटना घडण्यापूर्वी ती कोल्हापूर येथे गेली होती का त्याचा तपास देखील पोलीस करीत आहेत. कुटुंबीयांकडे केलेल्या चौकशीत देखील कोल्हापूरचा संदर्भ आला असून मृत्यूपूर्वी फोन सुरू असताना तिने कुटुंबीयांना दिलेल्या माहितीत देखील विसंगती आढळून आली होती. त्यामुळे तिला एवढ्या निर्दयीपणे का ठार मारण्यात आले याचा तपास देखील पोलीस करीत आहेत.

You cannot copy content of this page