⚡वेंगुर्ला ता.२७-: वेताळ प्रतिष्ठान आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच-दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिला पोलिसांसाठी राज्यस्तरीय खुल्या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणा-या पोलिस दलात महिला पोलिसांचे योगदान अतुलनीय आहे. कठोर वर्दीत, शिस्तबद्ध आणि कणखर स्वभाव असतानाही, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच ममतेचा स्पर्श असतो. त्या केवळ एक पोलिस अधिकारी नसून, एक आई, पत्नी, मुलगी, बहीण आणि समाजाच्या सुरक्षेच्या जबाबदारीने भारावलेल्या योद्धाही असतात. त्यांचे जीवन हे कर्तव्य आणि कुटुंब यांच्यात समतोल साधण्याचा एक संघर्ष असतो.
आजच्या घडीला महिला विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून, कायदा आणि सुव्यवस्थेच्या राखणीत महिला पोलिस महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यांचा संघर्ष, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक भान यांना उचित व्यासपीठ मिळावे, तसेच समाजात त्यांचा ठसा उमटावा, यासाठी या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी कठोर वर्दीत ममतेचा स्पर्श - महिला पोलिसांची दुहेरी जबाबदारी‘ हा विषय ठेवण्यात आला असून ७०० ते १००० शब्दांमध्ये मराठीत आपले विचार मांडायचे आहेत. सोबत महिला पोलिस असल्याचे शिफारसपत्र जोडणे अनिवार्य आहे.
प्रथम तीन विजेत्यांना १०००, ७००, ५०० तर उत्तेजनार्थ २५० ची दोन पारितोषिके तसेच चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपले निबंध ५ एप्रिलपर्यंत वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस, द्वारा-प्रा.डॉ.सचिन वासुदेव परूळकर, मु.पो. तुळस, ता.वेंगुर्ला, जि.-सिंधुदुर्ग, पिन- ४१६५१५ यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.सचिन परूळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संफ साधावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.
