आंगणेवाडीच्या भक्तांना सोयी सुविधा मिळवून देणे हे आमचे कर्तव्य…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे:ना. शिंदे यांनी आंगणेवाडीत घेतले भराडी देवीचे दर्शन..

⚡मालवण ता.२६-:
आंगणेवाडी यात्रेला भराडी देवीच्या दर्शनाला मला यायचे होते. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कार्यक्रम असल्याने मी येऊ शकलो नाही. मात्र देवीचे दर्शन होणारच होते ते आज झाले. कुणकेश्वर आणि व आंगणेवाडी असे दोन्हीचे दर्शन झाले. आंगणेवाडी हे महाराष्ट्र व बाहेरच्या लोकांचे श्रद्धास्थान आहे. येथे आलेला प्रत्येकजण जीवनात सुखी समृद्ध होत असतो. आंगणेवाडी सारख्या तीर्थक्षेत्रांचा
विकास कारणे, याठिकाणी कनेक्टिव्हीटी वाढवणे, भक्तांना सोयी सुविधा मिळवून देणे आदी कामे आम्ही करणार आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे बोलताना केले

सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आंगणेवाडी येथे भेट देऊन श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक, आमदार किरण सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आंगणेवाडीत श्री भराडी मातेच्या दर्शनास आल्यावर प्रेरणा व ऊर्जा मिळते. भराडी मातेच्या आशीर्वादाने राज्यात महायुतीला दैदिप्यमान यश मिळाले. महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ यांच्या जीवनात चांगले, सुखाचे, समृद्धीचे दिवस येऊ देत, सर्वसामान्य माणसाची प्रगती व्हावी, महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे या भागात उद्योग आले पाहिजेत, असे साकडे आपण श्री भराडी देवीच्या चरणी घातले आहे, असेही ते म्हणाले
श्री देवी भराडीच्या आशीर्वादाने गेली अडीज वर्षे राज्यात महायुतीने जे काम केले, लाडक्या बहिणी, भावांनी शेतकऱ्यांनी व ज्येष्ठानी भरभरून आशीर्वाद दिले. त्यामुळे निवडणुकीत महायुतीला दैदिप्यमान यश मिळाले, यापूर्वी महायुतीचे २३२ आमदार कधीच निवडून आले नव्हते ते यावेळेस आले. त्यामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले

यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, आंगणेवाडी मध्ये पाण्याचा प्रश्न आहे, आंगणेवाडी पासून दीड किलोमीटर अंतरावर एक धरण बांधले जात आहे, तिथून पाणी लिफ्टिंगसाठी १० ते १५ कोटी खर्चाची अपेक्षा आहे. याद्वारे आंगणेवाडी चा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपू शकतो. आणि हा प्रश्न याच बजेटच्या माध्यमातून संपवावा अशी आमची उपमुख्यमंत्र्यांकडे आमची विनंती आहे. तसेच आंगणेवाडी मध्ये नेटवर्कची समस्या असल्याने पुढच्या जत्रेच्या आत आपण जिओ चा टॉवर आंगणेवाडीत उभारणारा असा शब्द आपण ग्रामस्थांना दिला आहे, याबाबतही सहकार्य मिळावे, असेही आम. निलेश राणे म्हणाले.

यावेळी आंगणे कुटुंबियांतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भव्य पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी आंगणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, यांच्यासह आंगणे कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page