३ मार्च पर्यंत वेतन न झाल्यास सीईओ दालनासमोर आंदोलन करण्याचा संघटनेचा इशारा..
सिंधुदुर्गनगरी ता २४
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त ग्रामसेवकांच्या निवृत्तीवेतनासाठी लागणारा निधी राज्य शासना कडून आगाऊ प्राप्त होऊनही निवृत्ती वेतन वेळीच दिले जात नाही. याकड़े मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाच्या वतीने आज निवेदन सादर केले . तर ३ मार्च पर्यंत वेतन न मिळाल्यास ७ मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या निवृत्तीवेतन धारकांच्या निवृत्तीवेतनासाठी लागणारा निधी राज्य शासनाकडून आगाऊ प्राप्त होतो . तरीही प्रशासनाच्या वेळ काढु धोरणामुळे निवृत्ती वेतन वेळीच दिले जात नाही. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे अर्ज विनंती करूनही त्याचा काही उपयोग होत नाही. प्रशासनामध्ये काही ना काही घोळ होत असल्याने निवृत्तीवेतन वेळेत प्राप्त होत नाही. जानेवारी चे निवृत्तीवेतन १५ फेब्रुवारीला मिळाले. प्रत्येक महिन्याच्या २ तारीख पर्यंत निवृत्ती वेतन प्राप्त होणे अपेक्षित आहे. तरी फेब्रुवारी२०२५ चे निवृत्तीवेतन सोमवार दिनांक ३ मार्च पर्यंत प्राप्त न झाल्यास शुक्रवार ७ मार्च २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश बाळकृष्ण राणे, उपाध्यक्ष हनुमंत प्रभू, सचिव प्रकाश बाबाजी राणे यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
